मोशी : कडक उन्हात पहावी लागते बसची वाट | पुढारी

मोशी : कडक उन्हात पहावी लागते बसची वाट

मोशी(पुणे) : पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे एसटीचा थांबा आहे. मात्र, मोशीकडून नाशिककडे जाणार्‍या प्रवाशांना बसण्यासाठी बसशेड नसल्याने उन्हात उभे राहत बसची वाट पाहवी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. एसटी महामंडळाने पूर्वेकडे बसशेड उभारले असून पश्चिमेकडे उभारले नाही. त्यामुळे प्रवाशांसोबत असा दुजाभाव का ?, भोसरीकडे जाणार्‍या प्रवाशांची सोय तर नाशिककडे जाणार्‍या भाविकांची गैरसोय का ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष

विविध सामाजिक संस्था व प्रवाशांकडून वारंवार पश्चिमेला बसशेड उभारण्याची मागणी करण्यात येऊनही प्रशासनाच्या वतीने याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे प्रवाशांना उन्हाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोशीतील मुख्य चौकात प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. लोकसंख्येच्या मानाने या भागात नोकरी, शिक्षण, रोजगारासाठी आलेल्या प्रवाशी वर्गाची एसटी स्टँडवर भरमसाठ गर्दी असते. रोजच्या दैनंदिन कामकाजासाठी ये-जा करणारे प्रवाशी बस पकडण्यासाठी मोशी मुख्य चौकात उभे राहतात.

तात्काळ बसशेड उभारण्याची मागणी

यात प्रामुख्याने शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची गर्दी जास्त असते. त्यांना एसटी बस स्टँडवर भर उन्हात बसची वाट पाहत उभे राहावे लागते. परंतु, महापालिकेकडून याकडे डोळेझाक केली जात आहे. या प्रकरणाबाबत कोणत्याही राजकीय पक्षाकडून आवाज उठविला जात नसल्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे. तरी प्रशासनाने या दुरवस्थेची दखल घेऊन तात्काळ बसशेड उभारावे, अशी मागणी प्रवाशी करत आहेत.

जागेचा प्रश्न मिटणार

बसशेड उभारण्याबाबत जागेचा प्रश्न असल्याने बसशेड उभारण्यात अडचण निर्माण झाली आहे. जागा नसल्याने बसशेड उभारले जात नसल्याचे सांगितले जाते. मात्र, आता रस्ता रुंदीकरणात संबंधित जागा ताब्यात येणार आहे. त्यामुळे येथे तात्पुरते बसशेड उभारल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होऊ शकते.

Back to top button