बेलसर : उन्हाच्या तीव्रतेमुळे बिबट्या मानवी वस्तीकडे | पुढारी

बेलसर : उन्हाच्या तीव्रतेमुळे बिबट्या मानवी वस्तीकडे

बेलसर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. वन्यप्राणी आता पाणी व अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथील भगतवस्ती येथे शुक्रवारी (दि. 19) मध्यरात्री एक बिबट्या व त्याच्या दोन बछड्यांनी दर्शन दिले आहे. शनिवारी सकाळी सिंगापूर हद्दीत हेच बिबटे दिसून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पारगाव मेमाणे येथील बाळू मेमाणे हे शेतातून ट्रॅक्टर घरी घेऊन येत असताना, त्यांना ट्रॅक्टरच्या लाइटच्या उजेडात त्यांच्या घराशेजारी गोठ्याजवळ तीन बिबटे दिसले. त्यांनी वस्तीवरील लोकांना जमा करून बिबट्यांना पळून लावले. या वेळी एक बिबट्या कुत्र्याच्या अंगावर धावून आला. काही वेळानंतर वस्तीवरील सर्व लोक जमा होऊन बिबटे नेमके कुठे लपून बसले आहेत, याचा शोध घेत होते. दरम्यान, चंद्रशेखर मेमाणे यांच्या शेतातील कडुनिंबाच्या झाडावर बसलेल्या बिबट्याने झाडावरून खाली उडी मारून उसाच्या शेतात पळ काढला.

त्यानंतर एक तासाने वस्तीजवळील ग्रामपंचायतीच्या विहिरीशेजारील भरावावर एक बिबट्या दिसला. लोकांना पाहून तोही तिथून पळून गेला. रात्री आठ ते दहा या वेळेत साधारण चार ते पाचवेळा बिबट्या दिसला आहे. रात्री 9 वाजता प्रकार घडल्यावर रात्री 12 वाजता वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाने हा प्रकार गांभीर्याने घेऊन त्वरित कार्यवाही करावी; अन्यथा पाळीव प्राणी बळी पडतील. मानवी जीवनमानही विस्कळीत होईल, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

बिबट्यापासून संरक्षणाचे उपाय

  • शेतात फिरताना गळ्याभोवती मफलर किंवा रुमाल गुंडाळावा. कारण, बिबट्या नेहमी गळ्यावर हल्ला करतो.
  • शेतात फिरताना मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावावीत.
  • बिबट्या समोर दिसल्यास खाली न बसता उभे राहावे. कारण, बिबट्या नेहमी त्याच्या उंचीच्या समांतर भक्ष्याची शिकार करतो.
  • शेतात एकटे असल्यास गाणे गुणगुणत राहा. नेहमी सोबत काठी असावी. दोघा-तिघांच्या समूहाने फिरा.
  • सोबत शिट्टी ठेवावी. शेतात शौचास न जाता शौचालयाचा वापर करा. रात्री घराबाहेर दिवे चालू ठेवावेत.

तालुक्यात बिबट्या दिसण्याच्या घटनांबाबत माहिती मिळत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सावधानता बाळगावी. वन विभाग रात्रीची गस्त घालत आहे. शाळा, ग्रामपंचायतीमध्ये जनजागृती करून बिबट्यापासून कसे संरक्षण करावे, याबाबत माहिती देत आहेत.

                                                                – विशाल चव्हाण,
                                                     तालुका वन अधिकारी, पुरंदर

वन विभागाने नागरिकांना मार्ग दर्शन करून योग्य उपाययोजना कराव्यात. फोन केल्यावर त्वरित यावे.
                                                         – ज्योती मेमाणे, सरपंच

 

Back to top button