पुणे: एफटीआयआयमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्याची तब्येत बिघडली

पुणे: एफटीआयआयमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्याची तब्येत बिघडली

पुणे, पुढारी वृत्तसेवा: फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) 2020 च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी पुकारलेले उपोषण अद्यापही सुरू असून, पाचव्या दिवशी तिघांपैकी एकाची तब्येत ढासळली आहे. त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तरीही यावर एफटीआयआय प्रशासन ढिम्म आहे. विद्यार्थी उपोषणास बसून पाच दिवस उलटले, तरी अद्याप प्रशासनातील एकही व्यक्ती उपोषणस्थळी फिरकलेली नसल्याचे एफटीआयआय स्टुडंटस असोसिएशनचे म्हणणे आहे.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षातील अनुपस्थिती आणि अपेक्षित क्रेडिट नसणे या कारणास्तव संस्थेने पाच विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ त्या वर्षातील विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गेल्या पाच दिवसांपासून काही विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. एका विद्यार्थ्याला 2020 च्या शैक्षणिक वर्षात समाविष्ट करून घ्यावे, प्रशासनाने प्रॉक्टर नोटीस मागे घ्यावी आणि उपोषण स्थगित झाल्यानंतर तातडीने नोटीस दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम सुरू करावा तसेच इन्स्टिट्यूटमध्ये मानसिक आरोग्य सेल स्थापन करावा, अशा मागण्यांसाठी विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. मात्र, एफटीआयआय प्रशासनाने येत्या 30 मे ला शैक्षणिक परिषदेची बैठक आयोजित केली आहे. मात्र, त्याला खूप कालावधी बाकी आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य बघता हा प्रश्न प्रशासनाने तातडीने सोडविण्याची गरज आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांप्रति सहानुभूती दाखवावी आणि त्यांची भेट घ्यावी, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची स्थिती दिवसागणिक ढासळत आहे. या बॅचमधील अजून दोन विद्यार्थी शुक्रवारपासून (दि.19) उपोषणाला बसले असल्याची माहिती असोसिएशनतर्फे देण्यात आली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news