बारामतीतील रेणुकानगर घाणीच्या विळख्यात; रहिवासी हैराण | पुढारी

बारामतीतील रेणुकानगर घाणीच्या विळख्यात; रहिवासी हैराण

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती नगरपरिषदेच्या हद्दीतील फलटण रस्त्यालगतचे रेणुकानगर सध्या घाणीच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या येथील अनेकजण साथीच्या आजाराने हैराण झाले आहेत. आम्ही माणसं नाही का? आम्हाला मूलभूत सोयीसुविधा का दिल्या जात नाहीत? आमच्याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष का? असे प्रश्न संतप्त रहिवाशी करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रेणुकानगरमध्ये वसाहती वाढू लागल्या आहेत. परंतु, या परिसरातील रहिवाशांना नगरपरिषदेकडून आवश्यक त्या मूलभूत सोयी-सुविधा अद्यापही मिळालेल्या नाहीत. रहिवासी दरवर्षी येथील नगरपरिषदेचा कर भरत आहेत. परंतु, या भागात अंतर्गत रस्ते, पथदिवे व अन्य सुविधा दिल्या गेल्या नाहीत. अनेकांनी ड्रेनेजलाईन नसल्याने शोषखड्डे तयार करत सांडपाण्याची विल्हेवाट लावली आहे; परंतु हे शोषखड्डे आता पूर्णतः भरले आहेत. पुढे या शोषखड्ड्यांतील सांडपाणी व मैला ड्रेनेजद्वारे बाहेर वाहू लागल्याने दुर्गंधी पसरली आहे. अनेकदा शोषखड्ड्यातील पाणी शेजारच्या दारात जात असल्याने वादावादीचे प्रसंग घडत आहेत.

नगरपरिषदेचे अधिकारी व ठेकेदार जाणीवपूर्वक येथील रहिवाशांच्या अडचणी व तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहेत. याबाबत अनेकदा पत्रव्यवहार, पाठपुरावा केला; परंतु चाल-ढकल केली जात असल्याचा आरोप येथील रहिवासी योगेश महाडिक यांनी केला आहे. प्रत्येक निवडणुकीला आमच्याकडे नेतेमंडळी येतात. भरभरून आश्वासने देतात, मतदान झाल्यानंतर मात्र या भागातील प्रश्नांकडे ढुंकूनही पाहिले जात नसल्याचे इतर रहिवासी सांगत आहेत.

Back to top button