पुण्यात आरबीआयच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीने २ हजार रुपयांच्या नोटेला हार घालत वाहिली श्रध्दांजली | पुढारी

पुण्यात आरबीआयच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीने २ हजार रुपयांच्या नोटेला हार घालत वाहिली श्रध्दांजली

पुणे पुढारी ऑनलाईन: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवार १९ मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. दिन हजारांच्या नोटा नागरिकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकेत जमा करता येणार आहेत. या निर्णयानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाबाहेर २ हजार रुपयांच्या नोटेला हार घालत श्रध्दांजली वाहिली. या आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानी प्रतिकात्मक १० लाख रुपये किंमतीच्या २ हजार रुपयांच्या नोटा फुटपाथवर ठेवून निषेध नोंदविला.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला गेला. यामुळे काळा पैसा बाहेर येईल, असे त्यावेळी भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, नोटबंदीमधून काहीच साध्य झालं नाही. उलट बँकेच्या रांगेत थांबून अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले. त्या सर्व लोकांच्या मृत्यूसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार होते. त्याबाबत मोदी यांनी कधीच भूमिका मांडली नाही. कर्नाटक राज्यात झालेल्या पराभवामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयातून काय साध्य होणार आहे. हे आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगावं, अशी मागणी देखील जगताप यांनी केली.

Back to top button