पिंपरी : अद्याप एकाही होर्डिंगचालकांवर गुन्हा दाखल नाही | पुढारी

पिंपरी : अद्याप एकाही होर्डिंगचालकांवर गुन्हा दाखल नाही

पिंपरी(पुणे) : महापालिकेच्या वतीने शहरातील परवानाधारक व अनधिकृत होर्डिंगचालक व मालकांना होर्डिंगचे स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याला तब्बल 608 होर्डिंगमालकांनी प्रतिसाद दिलेला नाही. ते होर्डिंग तोडण्याची कारवाई आकाशचिन्ह व परवाना विभागाने सुरू केली आहे. मात्र, अद्याप एकाही होर्डिंगमालकांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.

परवाना असलेले 1318 होर्डिंग

शहरात परवाना असलेले एकूण 1 हजार 318 होर्डिंग आहेत. त्यापैकी एकूण 799 होर्डिंगमालकांनी स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला सादर केला आहे. तर, अद्याप 519 होर्डिंगचा स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखल सादर करण्यात आलेला नाही. ते होर्डिंग तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयात गेलेल्या शहरातील 434 अनधिकृत होर्डिंगपैकी 222 होर्डिंगचे स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला प्राप्त झाला आहे.

तर, 114 होर्डिंग काढून घेण्यात आले आहेत. एकूण 89 होर्डिगचे स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखल अजून मिळालेला नाही. ते होर्डिंग तोडण्याचे आदेश सोमवारी (दि.15) देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शुक्रवारी (दि.19) सांगितले. होर्डिंग तोडण्याची कारवाई पुर्ण झाल्यानंतर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

एक कोटी 66 लाखांचा भरणा :

न्यायालयात गेलेल्या 434 होर्डिंगमालक व चालकांना गेल्या दोन वर्षांचे परवाना शुल्क भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. आतापर्यंत 106 होर्डिंगचे 1 कोटी 66 लाख रूपये आकाशचिन्ह व परवाना विभागात जमा करण्यात आले आहेत. एकूण 114 होर्डिंग काढून घेण्यात आले आहेत. उर्वरित 214 होर्डिंगसंदर्भातील परवाना शुल्क भरण्यासाठी होडिर्ंगमालक व चालक पुढे येत आहेत. प्रथम शुल्क भरून घेऊन त्यांच्याकडून नव्याने अर्ज घेण्यात येत आहे. नियमात असलेल्या होर्डिंगला परवाना दिला जाणार असून, इतर होर्डिंगवर कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.

Back to top button