उन्हाळी पर्यटनासाठी मिळतेय लोणावळ्याला पसंती | पुढारी

उन्हाळी पर्यटनासाठी मिळतेय लोणावळ्याला पसंती

लोणावळा(पुणे) : शाळा तसेच महाविद्यालयांना सध्या सुरू असलेल्या सुट्ट्या आणि या सुट्ट्यांची मजा लुटण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत बाहेर पडणार्‍या पर्यटकांकडून, विशेषतः मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड या महानगरांसह गुजरातमधून येणार्‍या हौशी पर्यटकांची पसंती म्हणून लोणावळा खंडाळा शहराकडे बघितले जाते. त्यामुळे सध्या याठिकाणी येणार्‍या पर्यटकांची मोठी संख्या बघायला मिळत आहे. असीम निसर्गसौंदर्याने नटलेले, समुद्रसपाटीपासून 625 मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावर वसलेले लोणावळा शहर हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे.

या ठिकाणी असलेली विपूल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्या आणि पावसाळ्यात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारे काही मनाला खूप खूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते आणि त्यातही पावसाळ्यात देशी-विदेशी पर्यटकांची याठिकाणी अक्षरशः जत्रा भरते. सध्याच्या रणरणत्या उन्हात हैराण झालेले नागरिक थोडा बदल म्हणून लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणीसारख्या थंड हवेच्या ठिकाणांना पर्यटनासाठी जास्त पसंती देतात.

मात्र, यात लोणावळा शहर हे प्रवासाच्या द़ृष्टीने जास्त सोयीचे असल्याने एक किंवा दोन दिवसांच्या सहलीसाठी पर्यटकांचा कल लोणावळा, खंडाळा शहरांकडे जास्त राहतो. लोणावळ्यात पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांची पहिली पसंती राहते ती भुशी धरणाला. हे धरण पावसाळ्यात पूर्ण भरल्यावर या धरणाच्या भिंतीला असलेल्या पायर्‍यांवरून फेसाळत वाहणार्‍या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी याठिकाणी प्रत्येक वीकेंडला एकाच वेळी हजारो, लाखो पर्यटक उपस्थिती लावत असतात आणि यावेळी या पर्यटकांमध्ये संचारलेला उत्साह हा केवळ पाहण्यासारखा असतो.

मात्र, सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्यात धरणाचा पाणीसाठा तळाला गेला असतानादेखील पर्यटक याठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. ‘हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट’ या गाण्यामुळे प्रत्येकाच्या ओळखीचा झालेला खंडाळा हा लोणावळा शहराचाच एक कसबा. मुंबई-पुणे या दोन महानगरांना जोडणारा महामार्ग तसेच एक्स्प्रेस वे ज्या घाटातून जातो तो बोर घाट तसेच मध्य रेल्वेच्या कर्जत आणि खंडाळा या स्टेशनला जोडणारा घाट हा खंडाळा घाट म्हणून ओळखला जातो.

या घाटामधून प्रवास करताना तसेच पुणे जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असणार्‍या अमृतांजन पुलावर उभे राहून या ठिकाणी निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली सौंदर्याची उधळण पाहणे म्हणजे एक कधीही विसरता न येणारी एक सुखद अनुभूती असते. ही अनुभूती घेताना पर्यटक अक्षरशः हरखून जातात. या पुलावर उभे राहिल्यावर संपूर्ण खंडाळा बोर घाट, त्यात उठून दिसणारे मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचे वळणदार रस्ते, घाटाखाली वसलेले

खोपोली, खालपासून पासून दूरवर दिसणारे माथेरान पर्यटकांना साद घालत असते. लोणावळा शहरातून भुशी धरणाच्या मार्गे सहारा आंबी व्हॅली सिटीकडे जाताना रस्त्यात भेटणारे लायन्स आणि टायगर्स पॉईंट म्हणजे पर्यटकांचे बारमाही आकर्षण स्थळ. सध्या उन्हाळ्यात देखील पर्यटकांची सर्वाधिक गर्दी दिसते ती या ठिकाणी. येथील निसर्ग न्याहाळत येथील टपर्‍यांमधून मिळणारी गरमागरम स्वीट कॉर्न भजी खाण्याची मज्जा काही औरच असते. लोणावळ्याची चिक्की सर्वदूर प्रसिद्ध याशिवाय लोणावळा शहरात आणि शहराच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.

यात राजमाची पॉईंट, वलवण धरण, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजे येथील लेणी, पवना धरण, राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना हे किल्ले ही त्यापैकी काही ठळक ठिकाणे आहे. येथील हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स तसेच हॉटेल्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यामुळे पावसाळ्यातील येथील निसर्ग सौंदर्याचा तसेच येथील जगप्रसिद्ध चिक्कीचा आस्वाद घेण्यासाठी किमान एकदा तरी नक्कीच यावे.

तुंगार्ली धरण परिसरात अनेक चित्रपटांचे झाले शूटिंग

पूर्वी लोणावळा शहराला पाणीपुरवठा करणारे ब्रिटिशकालीन तुंगार्ली धरण हे देखील लोणावळ्यात येणार्‍या पर्यटकांचे आकर्षण स्थळ बनून राहिलेले आहे. या धरणाच्या मुख्य भिंतीवर तसेच परिसरात आजवर अनेक चित्रपटांचे शूटिंग करण्यात आले आहे. शिवाय प्री वेडिंग शूटिंगसाठी येणार्‍या जोडप्यांचे आवडते ठिकाण म्हणूनही तुंगार्ली धरणाचे नाव घेतले जाते.

लोणावळ्याला कसे यावे

मुंबईपासून 90 किलोमीटर आणि पुण्यातून 68 किलोमीटरवर असणारे लोणावळा शहर या दोन्ही महामार्गाच्या मध्ये वसलेले आहे. भारतातील पहिला एक्स्प्रेस हायवे असणारा यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवे हा लोणावळा शहरातूनच गेलेला आहे. याशिवाय जुना मुंबई-पुणे महामार्ग देखील लोणावळा शहराच्या मध्यातून जातो. त्यामुळे आपल्याकडे कोणतेही वाहन असले तरी याठिकाणी पोहोचणे सोयीस्कर ठरते, शिवाय लोणावळा रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वेचा एक महत्त्वपूर्ण स्टेशन असल्याने लांब पल्ल्याच्या तसेच सर्व सुपरफास्ट गाड्या याठिकाणी थांबतात.

Back to top button