पुणे : ठग रॉयला पश्चिम बंगालमधून बेड्या | पुढारी

पुणे : ठग रॉयला पश्चिम बंगालमधून बेड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : औषधाच्या पार्सलबाबत माहिती देण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका ज्येष्ठाची लिंकद्वारे 1 लाख 23 हजार 999 रुपयांची फसवणूक करणार्‍या ठगाला चंदननगर पोलिसांनी पश्चिम बंगाल येथून बेड्या ठोकल्या. समीर नरेश रॉय (वय 21, रा. दक्षिण दिनाजपूर, पश्चिम बंगाल) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी खराडी येथील 68 वर्षीय ज्येष्ठाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार रॉय याच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे.

फिर्यादींनी ऑनलाईन औषधे कुरिअरद्वारे मागवली होती. ते कुरिअर कोठेपर्यंत आले आहे हे तपासण्यासाठी त्यांनी गुगलवर ऑनलाईन सर्च केले. ठग रॉय याने बनावट संकेतस्थळ तयार करून आपला मोबाईल क्रमांक दिला होता. त्याद्वारे त्याने फिर्यादींची फसवणूक केली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता हा गुन्हा पश्चिम बंगाल येथील एकाने केल्याचे समोर आले.

त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर रेवले पोलिस कर्मचारी उकिर्डे, मेमाने यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांची मदत घेऊन रॉय याला त्याच्या गावातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तेथील स्थानिक न्यायालयात हजर करून सहा दिवसांची ट्रान्झिस्ट रिमांड घेऊन रॉय याला चंदनगर पोलिस पुण्यात घेऊन आले. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

Back to top button