पुणे : प्रमाणपत्रे वाटणार्‍या आणखी दोघांना बेड्या | पुढारी

पुणे : प्रमाणपत्रे वाटणार्‍या आणखी दोघांना बेड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केवळ महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल स्थापन करून दहावीचीच नव्हे, तर आरोपींनी वेगवेगळे बोर्ड आणि विद्यापीठे स्थापन करून 2 हजार 739 विद्यार्थ्यांना 35 ते 80 हजार रुपये घेऊन बोगस प्रमाणपत्रे वाटल्याचा प्रकार उजेडात आणल्यानंतर गुन्हे शाखेने याप्रकरणी आणखी दोन एजंटांना बेड्या ठोकल्या.

जमाल अजगर शेख (36) आणि महेश विश्वकर्मा (34, चांदवली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यातील अटक करण्यात आलेला शेख हा बेरोजगार असून, त्याने लोकांना आठ प्रमाणपत्रे पैसे घेऊन वाटली आहेत. तर विश्वकर्मा हा होमगार्डच्या सेवेत असून, त्याने लोकांना पैसे घेऊन 35 प्रमाणपत्रे वाटल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी गुन्ह्यातील म्होरक्या सय्यद इम्रान सय्यद इब्राहीम (वय 38, रा. संभाजीनगर) हा बोगस प्रमाणपत्र वाटपातील म्होरक्या आहे.

पोलिसांनी त्याच्या ताब्यातून जप्त केलेल्या लॅपटॉप व मोबाईल मधून धक्कादायक माहिती हाती लागली आहे. तसेच महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल (एमएसआएस) च्या नावाने दहावी आणि बारावीची 741 प्रमाणपत्रे आर्थिक व्यवहार करून वाटली. अ‍ॅमडस विद्यापीठ, संभाजीनगर नावाने बी.एस्सी., बी.कॉम., बी.ए.ची 626 प्रमाणपत्रे, महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन एक्झामिनेशन (एमबीटीइइ) (आयआयटी) संभाजीनगर हे विद्यापीठ स्थापन करून डिप्लोमा, आयटीआय, इंजिनिअरिंगची 630 प्रमाणपत्रे वाटली.

तर दहावी-बारावीकरिता त्याने बोर्ड ऑफ सेंकडरी एज्युकेशन मराठवाडा संभाजीनगर या बोर्डाच्या नावाने 733 प्रमाणपत्रे, महाराष्ट्र राज्य मुक्त विश्वविद्यालय संभाजीनगरच्या नावाने बी.एस्सी, बी.कॉम., बी.ए.ची पाच, तर अलहिंद युनिर्व्हसिटी संभाजीनगरच्या नावाने बी.एस्सी, बी.कॉम आणि बी.ए.ची 4 बोगस प्रमाणेपत्रे पैसे घेऊन वाटल्याचा प्रकार निष्पन्न झाला आहे. सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बोगस प्रमाणपत्र प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यातील विश्वकर्मा होमगार्डमध्ये नोकरीस आहे. त्याने 35 तर दुसरा संशयित आरोपी जमाल शेख याने 8 प्रमाणपत्रे पैसे घेऊन वाटल्याचे समोर आले आहे. दोघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

                              – अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे.

Back to top button