पिंपरी : महाविद्यालयीन तरुणांना उत्तेजक इंजेक्शन विकणार्‍यास अटक | पुढारी

पिंपरी : महाविद्यालयीन तरुणांना उत्तेजक इंजेक्शन विकणार्‍यास अटक

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालयीन तरुणांना उत्तेजक इंजेक्शन आणि गांजा विक्री करणार्‍या एकाला पोलिसांनी पिंपरीतून अटक केली. त्याच्याकडून 642 ग्रॅम गांजा आणि मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 95 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. खंडणी विरोधी पथकाने ही कामगिरी केली. रवी चंद्रकांत थापा (32, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथक पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वायसीएम रुग्णालयासमोर गस्त घालत होते. त्या वेळी आरोपी संशयितपणे थांबल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये 16 हजार 50 रुपये किमतीचा 642 ग्रॅम गांजा आणि 25 हजार 460 रुपये किमतीच्या मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 95 बाटल्या मिळून आल्या.

तसेच, आरोपीकडून दोन हजार रुपये रोख रकमेसह एकूण 43 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहायक निरीक्षक उद्धव खाडे, सहायक फौजदार अशोक दुधवणे, पोलिस अंमलदार रमेश गायकवाड, निशांत काळे, विजय नलगे, किरण काटकर, सुनील कानगुडे, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली.

पोलिसांनी दिला धोक्याचा इशारा

महाविद्यालयीन तरुण जास्त वेळ व्यायाम करण्यासाठी मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनचा वापर करतात. मात्र, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशी औषधे घेणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा औषधांचे परस्पर सेवन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले

Back to top button