भोसरी : जलतरण तलावावर जीवघेणा खेळ! | पुढारी

भोसरी : जलतरण तलावावर जीवघेणा खेळ!

विजय जगदाळे

भोसरी : महापालिकेच्या क्रीडा विभागा अंतर्गत चालविण्यात येणार्‍या अनेक जलतरण तलावांवर सुरक्षितेची काळजी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यात भर की काय, प्रमाणित आणि प्रशिक्षित जीवरक्षक पुरेशा प्रमाणात जलतरण तलावावर उपलब्ध नसल्याने अडचणीत भर पडत आहे.

प्रशासनाचे खबरदारीकडे दुर्लक्ष

उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणत नागरिक पोहण्याचा आनंद घेत असतात. परंतु, क्रीडा विभागाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेत नसल्याने पालिकेच्या अनेक तलावांवर पोहण्यासाठी येणार्‍या मुलांची आणि नागरिकांची सुरक्षा रामभरोसे झाली असल्याचे चित्र आहे. क्रीडा विभागाच्यावतीने शहरात आठ जलतरण तलाव सुरू आहेत. संभाजीनगर येथील जलतरण तलावात एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता. तर, काही दिवसांपूर्वी नेहरूनगर येथील जलतरण तलावावर पोहण्यास आलेल्या एका तरूणांस वेळेत हॉस्पिटलमध्ये भर्ती केल्याने त्याचा जीव वाचला होता.

जलतरणपटूंची सुरक्षा रामभरोसे

अशा दुर्दैवी घटना वारंवार घडूनदेखील क्रीडा विभागाच्यावतीने सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यात उदासीनता दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पालिकेच्या अनेक तलावांवर पोहण्यासाठी येणार्‍या जलतरणपटूंची सुरक्षा रामभरोसे असल्याचे वारंवार चित्र पाहावयास दिसत आहे. अनेक तलावांवर नियमांची पायमल्ली होताना दिसते.

पालिकेच्या क्रीडा

विभागाच्यावतीने वेळेत उपायोजना केल्या नाहीत तर अनेक जलतरणपटूंचा नाहक जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरवर्षी उन्हाळ्याच्या कालावधीत मार्च, एप्रिल आणि मे अशा घटना घडतात. पुरेशा संख्येने जीवरक्षक नसणे अशा गोष्टी घडत असतानाही याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. ऑनलाईन बुकिंग असल्याने ज्याना पोहता येत नाही तेदेखील दैनंदिन किवा तिमाही पास काढत आहेत. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत असल्याचे नागरिक सांगतात.

माहिती देण्यास टाळाटाळ

पालिकेच्या मगर जलतरण तलावावरील लिपिक धनंजय जाधव यांच्याकडे दैनंदिन आकडेवारी व जलतरण तलावावरील घडलेल्या घटनेबद्दल अधिक माहितीसाठी फोन केला असता. आता गर्दी आहे असे सांगून आकडेवारी व माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.

महापालिकेच्या आठ जलतरण तलावांवर 16 जीवरक्षक व 16 सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. सोमवारपासून (दि. 22) प्रत्येक तलावावर आणखीन तीन जीवरक्षक नेमण्यात येणार आहेत. तसेच, कमी उंचीच्या ठिकाणीदेखील यापुढे जीवरक्षक असणार आहेत.

                             – सुनील जोशी, उपायुक्त क्रीडा विभाग

दैनंदिन तिकीट ऑनलाईन होण्याआधी सर्व जलतरण तलावांवर तुडूंब गर्दी असायची. त्या वेळी दुर्लक्ष होऊ शकते. परंतु, आता संख्या मर्यादित असताना आणि यंत्रणेवरचा ताण कमी झाला असतानादेखील अशा घटना घडता कामा नये. निष्काळजीपणामुळे जीव जाणे हे दुर्दैवी आहे.

                              – सुनील ननावरे, जलतरण प्रशिक्षक

Back to top button