पिंपरी : उंदरांमुळे झोपेचे खोबरे...! विश्रांतीगृहात चालक, वाहकांचे होताहेत हाल  | पुढारी

पिंपरी : उंदरांमुळे झोपेचे खोबरे...! विश्रांतीगृहात चालक, वाहकांचे होताहेत हाल 

राहुल हातोले
पिंपरी(पुणे) : वल्लभनगर आगारातील विश्रांतीगृहात प्रवेश करताच श्रमिक हो घ्या इथे विश्रांती, अशा सुंदर कवितेच्या ओळी या ठिकाणी मुक्क्कामी आलेल्या चालक-वाहकांचे स्वागत करतात; मात्र विश्रांतीसाठी थांबल्यावर येथे मुक्कामी असलेले उंदीर आणि घुशींमुळे झोपायचे कुठे आणि कसे? या विचारानेच त्यांची झोप उडत असल्याची भावना याठिकाणी आलेले चालक-वाहक व्यक्त करत आहेत.
पिंपरी येथील वल्लभनगर आगारातील विश्रांतीगृहात उंदीर आणि घुशींनी धुमाकूळ घातला आहे. यातच बंद पडलेले पंखे, विजेचे दिवे आणि झोपण्यासाठी लोखंडी पलंग मात्र त्यावर गादी ऐवजी लाकडी पट्टी तसेच बाजूला साचणारे सांडपाणी त्यामुळे पसरलेली दुर्गंधी अशा परिस्थितीत दूरवरून विसाव्यासाठी आलेले एसटीचे चालक आणि वाहक त्रस्त झाले आहेत.  प्रत्येक कर्मचारी हा लांबचा पल्ला गाठून आरामासाठी म्हणून तो विश्रांतीगृहात जातो परंतु तेथे सुविधांची वानवा असल्याने विश्रांतीऐवजी त्रासच सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

विश्रामगृहाची परिस्थिती

  •  उंदीर आणि घुशी वाढल्याने पिशव्या, सोबतची कागदपत्रे आदी साहित्य कुरतडल्याने नुकसान होत आहे.
  • रणरणत्या उन्हाळामुळे जीवाची काहीली होत असताना विश्रामगृहातील पंखे बंद आहेत.
  • लाईट बंद असल्याने अंधारातच राहावे लागते.
  • विश्रांतीगृहातील इलेक्ट्रिक बोर्ड तुटल्याने तिकीट मशीन तसेच मोबाईल चार्ज करता येत नाहीत.
  • सुरक्षा रक्षक नसल्याने चोरीच्या घटना घडतात.
  • सीसीटीव्ही बंद असल्याने भुरट्या चोरांना ऊत आला आहे.
  • स्वच्छतगृहातील बेसीनचे नळ, दरवाजा, पाईपलाईन तुटली आहे.
  • छत लिकेज असल्याने सतत पाणी गळत आहे.
प्रवाशांच्या जीवाची आमच्यावर जबाबदारी असते. त्यांना सुखरूप आणि निश्चितस्थळी वेळेवर पोहोचविणे हे आमच कर्तव्य आहे; मात्र थोडी विश्रांती घ्यावी म्हटले तर इथे अस्वच्छता आणि उंदीर, घुशींचा त्रास होतो. त्यामुळे  शांत झोप मिळणे मुुश्किल झाले आहे. त्यामुळे  आमच्या विश्रांतीची व्यवस्थित सोय करणे गरजेचे आहे.
                                                                – यु. आर. देशमुख, चालक.
येथील विश्रांतीगृहाच्या परिस्थितीबद्दल मिटींग घेण्यात आली आहे. नवीन अभियान अंतर्गत नियोजन करून सर्व विश्रांतीगृहांचे नूतनीकरण लवकरच करण्यात येणार आहे.
                                                          – अशोक सोट, अतिरिक्त विभाग नियंत्रक, पुणे विभाग.

Back to top button