पुणे : जिल्हा रुग्णालयाचे खासगीकरण नको; अन्यथा आंदोलन | पुढारी

पुणे : जिल्हा रुग्णालयाचे खासगीकरण नको; अन्यथा आंदोलन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरासह जिल्ह्यातील सामान्य रुग्णांसाठी आरोग्य सेवा देणारे औंध जिल्हा रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा घाट शासन घालू पाहत आहे. खासगी रुग्णालये आरोग्य क्षेत्र गिळंकृत करीत आहेत. असे असताना शासकीय आरोग्य सेवा खासगी कंपनीच्या दावणीला बांधण्यास आरोग्य कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध होत आहे. निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी 16 मे रोजी मंत्रालयात बैठक घेतल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये औंध जिल्हा सामान्य रुग्णालयाचा पीपीपी अर्थात खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर विकास करण्याबाबत चर्चा झाली. यासाठी लवकरच आरोग्य मंत्री आणि अधिकार्‍यांकडून पाहणी केली जाणार आहे.

औंध जिल्हा रुग्णालय 300 खाटांचे असून, नाक-घास-कान तपासणीपासून प्रत्यारोपण, नवजात कक्ष असे अद्ययावत उपचार मोफत उपलब्ध करून दिले जातात. सध्या रुग्णालयात केवळ सीटी स्कॅन आणि एमआरआय तपासण्यांचे काम खासगी एजन्सीला देण्यात आले आहे. शासनाकडून खासगीकरणास सुरुवात झाल्यास गरीब, गरजू रुग्ण मोफत उपचारांना पारखे होणार आहेत.

औंध जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेच्या खासगीकरणाबाबत आम्हाला कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. राज्याच्या आरोग्य विभागातील बैठकीबाबत कल्पना नाही.

             – डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक,
                                  औंध जिल्हा रुग्णालय

Back to top button