

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : वैद्यकीय क्षेत्रात कॉर्पोरेट संस्कृती रुजू लागली आहे. आरोग्याच्या छोट्या तक्रारींसाठीही मोठ्या रुग्णालयांमध्ये जाण्याचे प्रमाण वाढले आहे. सुधारलेला आर्थिक स्तर, आरोग्य विम्याची सुविधा, स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जाण्याकडील वाढता कल यामुळे 'फॅमिली डॉक्टर'ही संकल्पना लोप पावत असल्याचे चित्र अलीकडे अधोरेखित होत आहे.
साधारणपणे 10-20 वर्षांपूर्वीपर्यंत फॅमिली डॉक्टर हा कुटुंबाचाच एक सदस्य मानला जायचा. पणजोबांपासून नातवापर्यंत सर्व कुटुंबाच्या आरोग्याची पार्श्वभूमी फॅमिली डॉक्टरला माहीत असायची. रुग्णाचा त्रास समजून घेऊन आणि मूलभूत तपासणी करून डॉक्टर नेमके औषधोपचार देऊन रुग्णाला दोन-तीन दिवसांमध्ये खणखणीत बरा करायचे. आजच्या काळात आरोग्याच्या समस्या वाढत असताना 'फॅमिली डॉक्टर'ही काळाची गरज असल्याचे मत जाणकारांनी नोंदवले आहे.
आजकाल आयटी क्षेत्र तसेच मोठ्या कंपन्यांमध्ये आरोग्य विम्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. आरोग्याचा काहीही त्रास होत असल्यास मोठ्या रुग्णालयांमध्ये धाव घेतली जाते. रुग्णाला वेगवेगळया ब-याच तपासण्या करण्यास सांगितले जाते. एखाद्या तपासणीत काही छोटेसे निदान झाले तरी दोन-तीन दिवस अॅडमिट करून घेतले जाते. याउलट फॅमिली डॉक्टरला रुग्णाची वैद्यकीय पार्श्वभूमी माहीत असते. लक्षणे जाणून घेऊन, तपासून 200 ते 500 रुपयांमध्ये औषधोपचार केले जातात आणि बहुतांश वेळा रुग्णांना तीन-चार दिवसांमध्ये बरे वाटू लागते. मफॅमिली डॉक्टरफ ही संकल्पना मजबूत होणे ही काळाची गरज आहे.
– डॉ. संजय बुटाला, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनमफॅमिली डॉक्टरफ ही संकल्पना गेल्या 20 वर्षांपासून कमी होत आहे. त्यातही बीएएमएस, बीएचएम डॉक्टरांचे प्रमाण वाढत असून, एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाण कमी होत आहे. साधारणपणे 80 च्या दशकापासून वैद्यकीय शाखांमध्ये स्पेशलायझेशन सुरू झाले. त्यामुळे स्पेशालिस्टची संख्या वाढली. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमडी फॅमिली मेडिसीनच्या सीट्स जाहीर केल्या गेल्यास फॅमिली डॉक्टरांचे प्रमाण वाढू शकेल. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे फेलोशिप ऑफ कॉलेज जनरल प्रॅक्टिशनर अशा अभ्यासक्रमही चालवला जातो.
– डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, आयएमए