राष्ट्रवादीमुळे राज्यातील निवडणुका रखडल्या : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयात गेल्यामुळेच रखडल्या आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पुण्यात केली. मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा होता. राष्ट्रवादीने राज्यात शंभर आमदार निवडून आणण्याचे लक्ष ठेवले होते. राष्ट्रवादीमुळे आपली जागा धोक्यात येईल, या भीतीमुळे शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरे यांना सोडले, अशीही टीका त्यांनी केली.
भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. ते म्हणाले, ’महापालिका निवडणुका घेण्यास भाजप-शिवसेना आजही तयार आहे. महाविकास आघाडी सरकारने प्रभागरचनेसंदर्भात घेतलेला चुकीचा निर्णय आम्ही रद्द केला. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयात गेली आहे. म्हणून निवडणुकांना उशीर होत आहे.’ मंत्रिपदासाठी आमच्या कोणत्याही आमदाराने कोणालाही पैसे दिलेले नाहीत. मंत्रिपदासाठी आमचे आमदार नेत्यांनाही भेटत नाही, असे एका प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले. पुणे शहराध्यक्ष बदलण्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी लवकरच प्रत्येक जिल्ह्यातील संघटनात्मक पुनर्रचना केली जाणार असल्याचे सांगितले.
जे. पी. नड्डा यांच्या मुंबई दौर्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता. ते म्हणाले, ’सेनेतील नेतेमंडळी सोडून जातील, या भीतीनेच मुंबईत कोणी भाजपचे नेते आले की राऊत टीका करतात. जेव्हा केव्हा निवडणुका होतील, तेव्हा नड्डा यांचा प्रवास किती महत्त्वाचा होता, हे संजय राऊत यांना कळेलच.’
कुरुलकर यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधाबाबत ते म्हणाले, ’पक्षाने त्यावर भूमिका का मांडावी? त्यांची चौकशी सरकारमार्फत केली जात आहे. कोणत्या एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, तर त्यामुळे संस्थेला अथवा संघटनेला दोष देता येणार नाही. जर त्या व्यक्तीने गुन्हा केला असेल, तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे, ही पक्षाची भूमिका आहे. तो कोणत्या धर्माचा आहे किंवा जातीचा आहे, हे बघून भाजप कोणालाही टार्गेट करत नाही.’
पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात निर्णय झालेला नाही, त्यामुळे आता त्यावर बोलण्यावर काही अर्थ नाही, असे सांगून त्यांनी प्रश्नाला बगल दिली. केंद्र सरकारने महागाई, बेरोजगारी, सिलिंडरमध्ये झालेली दरवाढ कमी करावी, असा ठराव कार्यसमितीच्या बैठकीत मांडला जाणार का, या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, ‘हा प्रश्न आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडित आहे.
कर्नाटकच्या निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने अशी अनेक आश्वासने दिली. ती पूर्ण करण्याएवढे बजेट तरी त्यांच्याकडे आहे का?’ असे विचारत थेट उत्तर देणे टाळले. तसेच, मोंदीनी 2014 पूर्वी दिलेले 15 लाखांचे आश्वासन अभ्यास करूनच दिले होते का, या प्रश्नावरही त्यांनी बोलणे टाळले. पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असा ठराव करणार आहात का? या प्रश्नावर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत नाही, असे उत्तर दिले.
घर चलो अभियान…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या योजना आणि राज्य सरकारच्या निर्णयांची माहिती भाजपकडून प्रत्येक घरात पोहोचविली जाणार आहे. यासाठी 30 मे ते 30 जून या कालावधीत ‘घर चलो अभियान’ हाती घेण्यात येणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सशक्त बूथ अभियानही राबविले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला सर्वच 48 जागा मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच राज्यात 200 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.