पुणे : टंचाईच्या झळा अन् टँकरमाफियांची चलती ! | पुढारी

पुणे : टंचाईच्या झळा अन् टँकरमाफियांची चलती !

पुणे; टीम पुढारी : महापालिकेने शहर व उपनगरांत दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उपनगरांत ठिकठिकाणी पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. या परिस्थितीचा फायदा उठवत टँकरमाफिया मनमानी पद्धतीने दर आकारणी करून नागरिकांची पिळवणूक करीत आहेत. उपनगरांतील पाणीटंचाईचा दैनिक ‘पुढारी’ने घेतलेला हा आढावा.

फुरसंगी, उरुळी परिसरात मांडला पाण्याचा बाजार!

फुरसुंगी, उरुळी देवाची या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची प्रादेशिक नळपाणी योजना प्रशासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे अद्यापही पूर्ण होऊ शकली नाही, यामुळे नागरिक पिण्याच्या पाण्यापासून अद्यापही वंचित आहेत. दरम्यान, टँकरमाफियांनी परिसरात पाण्याचा बाजार मांडला आहे. पाण्यासाठी महिन्याला हजारो रुपये मोजावे लागत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

फुरसुंगी व उरुळी देवाची येथे 73 कोटी रुपयांची पाणी योजना गेल्या पाच वर्षांपूर्वी मंजूर झाली होती. मात्र, ही योजना विविध कारणांनी रखडल्याने परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. परिणामी, पाणी माफियांचा पाणी विक्रीचा धंदा सध्या तेजीत सुरू आहे. या परिसरात अनेक सोसायट्या आहेत. या इमारतीमधील नागरिकांना टँकर माफियांकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे.
एका टँकरचा दर तीन ते चार हजार रुपयांपर्यंत गेला आहे. जेवढी उच्चभ्रू सोसायटी तेवढा दर जास्त, अशी परिस्थिती या भागात टँकर माफियांनी निर्माण केली आहे. फुरसुंगी परिसरातील नागरिक सातववाडी येथून नळाचे पाणी भरून सायकलने घरी घेऊन जातात. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

महापालिकेचे टँकर पुरेनात!

मांजरी बुद्रुकमधील मांजराईनगर भागांमध्ये सटवाईनगर, राजीव गांधीनगर, माळवाडी, कुंजीरवस्ती आदी परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. झोपडपट्टी भागात बहुसंख्य लोक मोलमजुरी करीत असून, त्यांना विकतचे पाणी घेणे परवडत नाही. महापालिकेकडून पिण्याचे पाणी नियमित दिले जात नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

मांजरी बुद्रुक परिसरातील लोकसंख्या तुलनेते पालिकेकडून टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. बेल्हेकर वस्ती, माळवाडी, कुंजीरवस्ती, चारवाडा, भापकरमळा, मोरे वस्ती, मांजरी गावठाण, घावटे वस्ती व मांजराई देवी भागातील नागरिकांना सध्या टंचाईचा समाना करावा लागत आहे. या भागाला पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन आधिकार्‍यांनी दिले होते. मात्र, पाणीटंचाईची समस्या जैसे थे आहे. लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी भास्कर सीनवणे म्हणाले, की मांजरी बुद्रुक भागाला महापालिकेकडून दररोज पिण्याच्या पाण्याचे 18 टँकर दिले जात आहेत.

महापालिका मांजरीमधील नागरिकांना दररोज पिण्याच्या पाण्याचे 13 टँकर देत आहे. मात्र, लोकसंख्येचा विचार करता टँकरची संख्या अपुरी आहे. नागरिकांना पुरेशे पाणी मिळण्यासाठी 25 टँकरची गरज आहे.

                            -शैलेंद्र बेल्हेकर, रहिवासी, मांजरी बुद्रुक

Back to top button