पुणे : तंत्रज्ञानाचा अतिरेक पर्यावरणाला घातक; डॉ. दिलीप कुलकर्णी यांचे प्रतिपादन | पुढारी

पुणे : तंत्रज्ञानाचा अतिरेक पर्यावरणाला घातक; डॉ. दिलीप कुलकर्णी यांचे प्रतिपादन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आपल्या देशामध्ये विविध क्षेत्रांमध्ये प्रगती होताना दिसून येत असून, आपण विकासाच्या गप्पा मारत आहोत. देशात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असताना दुसर्‍या बाजूला पर्यावरणाचा मोठा र्‍हास होत आहे याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. तंत्रज्ञानाचा होणारा अतिरेक हा पर्यावरणाला घातक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
अ‍ॅड-व्हेंचर फाउंडेशन आणि महालक्ष्मी सभागृह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वसंतवैभव’ या निसर्गविषयक व्याख्यानमालेमध्ये ‘शाश्वत पर्यावरण’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक देशपांडे उपस्थित होते.

डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘एका बाजूला देशामध्ये सर्वच स्तरावर प्रगती होताना दिसून येत असताना दुसर्‍या बाजूला मात्र पर्यावरणाचा होणारा र्‍हास दिसून येत नाही. पर्यावरणाची सर्वच बाजूने हानी होत असून, निसर्गाचा केवळ उपभोग घेतला जात आहे. निसर्गाचा उपभोग घेत असताना निसर्गाला मात्र आपण काहीच देत नाही, ही मोठी खंत आहे.’

आजच्या काळामध्ये विज्ञानाने ऊर्जा तंत्रज्ञानावरची बंधने दूर केल्याने प्रदुषणाचा आणि निसर्गाचा प्रसंग उद्भवला आहे. जोपर्यंत आपल्याकडे सभ्यता नव्हती तोपर्यंत निसर्गाकडून किती घ्यायचे, प्रदूषण किती करायचे यावर बंधने होती. परंतु, ही बंधने आता राहिलेली नाहीत. एका वर्षामध्ये हजारो वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होताना आढळून येत आहेत. याला ज्याप्रमाणे मानव कारणीभूत आहे त्याचप्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विकास-प्रगती हेही त्याला जबाबदार असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी या वेळी सांगितले.

Back to top button