पुणे जिल्ह्यात ‘उत्पादन शुल्क’चे ऑपरेशन ‘हातभट्टी’ ! | पुढारी

पुणे जिल्ह्यात ‘उत्पादन शुल्क’चे ऑपरेशन ‘हातभट्टी’ !

अशोक मोराळे

पुणे : जिल्ह्यात अवैध पद्धतीने हातभट्टी दारूची निर्मिती करून विक्री करणार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी विशेष पथकांची निर्मिती केली असून, संपूर्ण जिल्ह्यात कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हातभट्टी अड्ड्यांची माहिती द्यावी. माहिती देणार्‍यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन रजपूत यांनी केले आहे.

जिल्ह्यात हातभट्टी निर्मिती व विक्री सुरू असलेले 97 हॉटस्पॉट शोधून काढण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक पथकाला टार्गेट देण्यात आले आहे. या हॉटस्पॉटचे रेड, ऑरेंज आणि येलो अशा तीन प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले आहे. रेडमध्ये जास्त तीव्रता, ऑरेंजमध्ये कमी तीव्रता, तर येलो मध्ये गंभीर नसलेल्या हॉटस्पॉटची विभागणी केलेली आहे. हे सर्व हॉटस्पॉट ग्रीन म्हणजेच हातभट्टीच्या अड्ड्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

तर खबरदार…!

जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क खात्याचे बारा विभाग आहेत. त्यानुसार त्यांना आपल्या कार्यक्षेत्रात अवैध मद्य निर्मिती व विक्री करणार्‍यांवर कारवाईचे अधिकार आहेत. मात्र, अनेकदा स्थानिक विभागातील पथकाकडून कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे अधीक्षकांनी विशेष पथकांची नेमणूक केली आहे. तर, विभागाच्या पथकांनादेखील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर जर कारवाईत टाळाटाळ केली, तर गंभीर दखल घेण्याचा इशारा दिला आहे.

आता गावात एक्साईज मित्र..

अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी पोलिस मित्रच्या धर्तीवर जिल्ह्यात एक्साईज मित्रांची नेमणूक करण्याची योजना हाती घेतली आहे. लवकरच याबाबत परिपत्रक काढून त्यांची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी होतकरू तरुणांना संधी दिला जाणार आहे. त्यांनी हातभट्टी असलेल्या हॉटस्पॉटची गोपनीय माहिती देणे अपेक्षित आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेत योग्य बक्षिसांनी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

जिल्हा हातभट्टी दारूमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. हॉटस्पॉट शोधून टार्गेट ठरविण्यात आले आहे. दोन पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रत्येक विभागात कारवाई सुरू आहे.

                    – चरणसिंह रजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे

Back to top button