पुणे : ऑनलाईन रिव्ह्यूव्ह कामाच्या आमिषाने एकाची फसवणूक | पुढारी

पुणे : ऑनलाईन रिव्ह्यूव्ह कामाच्या आमिषाने एकाची फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ऑनलाईन रिव्ह्यूव्हचे काम देतो असे आमिष दाखवून बिटकॉईन खरेदी करण्यास आणि 2 लाख 55 हजार रुपये पाठविण्यास सांगून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मोबाईलधारक आणि टार्गेटजी या डिजीटल मार्केटिंग कंपनी तसेच विविध बँक अकाउंटधारकांवर मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत आकाश महाविर नाबरिया (रा. पार्श्वनाथ सोसायटी, मार्केट यार्ड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 24 एप्रिल रोजी उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्या मोबाईलधारक व्यक्तीने व टार्गेटजी या डिजीटल मार्केटिंग कंपनीने फिर्यादी यांना ऑनलाईन ट्रास्क रिव्ह्यूव्हचे काम देतो, असे आमिष दाखवले. कामाचा मोबदला मिळविण्यासाठी बेसीलिका9610 ऑनलाईन या वेबसाईटवरून काही बिटकॉईन खरेदी करण्यास सांगून फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन 2 लाख 55 हजार रुपये विविध बँक अकाउंटवर ट्रान्सफर करण्यास सांगून आर्थिक फसवणूक केली.

रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग

महिलेला अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी, चतुःश्रृंगी पोलिसांनी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कोथरूड येथील 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी (दि.17) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास सेनापती बापट रस्त्यावर घडली आहे. फिर्यादींनी मोबाईलअ‍ॅपद्वारे सेवा देणार्‍या संकेतस्थळावरून ऑनलाईन रिक्षा सेवा घेतली होती.

कोथरूड ते सेनापती बापट रोड येथे त्या रिक्षातून आल्या. दरम्यान आरोपी रिक्षाचालकाने त्यांना सेनापती बापट रोडवर न सोडता मध्येच उतरण्यास सांगितले. फिर्यादी ह्या रिक्षातून उतरत असताना, रिक्षाचालकाने त्यांना शिवीगाळ करत मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

Back to top button