पुणे : ते दोन वाहतूक पोलीस निलंबित; काय आहे नेमकं प्रकरण ? | पुढारी

पुणे : ते दोन वाहतूक पोलीस निलंबित; काय आहे नेमकं प्रकरण ?

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई न करता, त्यांच्याकडून पैसे उकळणार्‍या स्वारगेट वाहतूक विभागातील दोन पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. पोलिस हवालदार बाळू दादा येडे व गौरव रमेश उभे अशी दोघांची नावे आहेत. एका नागरिकाने हे दोघेजण सामान्य नागरिकांकडून (वाहनचालकांकडून) पैसे गोळा करत असल्याबाबत व्हिडीओ टि्वट करून पुणे शहर वाहतूक पोलिस या टि्वटर खात्यावर टॅग केला होता. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

येडे व उभे या दोघांची नेमणूक स्वारगेट वाहतूक विभागात आहे. बुधवारी (दि.17) सकाळी दहा ते पावणेअकरा वाजताच्या सुमारास हे दोघे गंगाधाम आई-माता मंदिर रोड या ठिकाणी कर्तव्यावर होते. त्या वेळी ते वाहनचालकांकडून पैसे गोळा करत असलेबाबत व लाच घेतानाचे व्हिडीओ असे लिहून पाच व्हिडीओ एका व्यक्तीने पोलिसांच्या टि्वटरला टॅग केले होते. हा प्रकार निदर्शनास येताच वाहतूक विभागातील अधिकार्‍यांनी त्याची पाहणी केली.

त्या वेळी या दोघांनी संबंधित वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता, त्यांच्याकडून पैसे स्वीकारताना दिसून आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. तसेच ते वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची पावती अथवा कागदपत्रे परत देताना दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या या कृत्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा ठपका ठेवत दोघांना निलंबित करण्यात आले आहे.

Back to top button