राहुल गांधी यांच्या भाषणात उल्लेख असलेल्या पुस्तकांची यादी सादर करा; पुणे न्यायालयाचे आदेश | पुढारी

राहुल गांधी यांच्या भाषणात उल्लेख असलेल्या पुस्तकांची यादी सादर करा; पुणे न्यायालयाचे आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात दाखल पुराव्यांची तपासणी गुरुवारी पुणे येथील न्यायालयात करण्यात आली. दरम्यान गांधी यांनी केलेल्या भाषण लेखी स्वरूपात दाखल करावे. तसेच त्यांच्या भाषणात उल्लेख असलेल्या पुस्तकांची यादी न्यायालयात सादर करावी, असे आदेश प्रथवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांच्या न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत. इंग्लंड येथील एका कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी खोटी माहिती सांगत त्यांचा अपमान केला, असा दावा करीत सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयामध्ये मानहानीचा दावा दाखल केला आहे. राहुल गांधी यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याची कायद्यात नमूद असलेल्या तरतुदींप्रमाणे शिक्षा मिळावी, अशी मागणी या दाव्यात करण्यात आली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 4 जुलैला रोजी होणार आहे. त्यात सात्यकी सावरकर यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. सात्यकी सावरकर यांच्याकडून अ‍ॅड. संग्राम कोल्हटकर बाजू मांडत आहेत.

प्रतिवादी याचिकर्ता जर लांब राहणारा असेल तर अशा याचिकेत न्यायालय सुरवातीला पुराव्यांची तपासणी करते. त्याच पध्दतीने गुरूवारी दाखल याचिकेत पुराव्यांची तपासणी झाल्यानंतर न्यायालयाने राहुल गांधी यांच्या भाषणात उल्लेख असलेल्या पुस्तकांची यादी व भाषण लेखी स्वरूपात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
                                        – ऍड. संग्राम कोल्हटकर, याचिकाकर्त्यांचे वकील.

Back to top button