पिंपरखेड (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पिंपरखेड (ता. शिरूर) येथील दाभाडेमळा परिसरात सात ते आठ चोरट्यांनी बाळू नावजी दाभाडे यांच्या घरावर दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी हत्यारांचा धाक दाखवून महिलांच्या अंगावरील दहा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेत पोबारा केला. त्यांनी आणखी एका घरात प्रवेश करून सोन्याचा वेल व पाच हजार रुपये रक्कम असा एकूण अंदाजे ५ लाखांचा ऐवज घेऊन पलायन केल्याची घटना गुरूवार १८ मे रोजी पहाटे घडली. या घटनेने पिंपरखेड परिसरात खळबळ उडाली आहे.
गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दाभाडेमळा येथील बाळू नावजी दाभाडे हे आपल्या कुटुंबियांसह घरात झोपलेले असताना घराचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. जवळ बाळगलेल्या कोयता, गलूर आणि दांडक्याच्या धाकाने घरातील महिलांच्या अंगावरील सुमारे नऊ ते दहा तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसकावले. तसेच घरातील कपाटे उचकून वापरतील कपडे बाहेर अस्ताव्यस्त फेकून दिली. यावेळी सात ते आठ जण या टोळीत असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. त्यानंतर आजूबाजूच्या घरांच्या कड्या लावून जवळच असणाऱ्या अंजनाबाई धोंडिभाऊ दाभाडे यांच्या घरावर चोरांनी मोर्चा वळवून वृद्ध महिलेच्या कानातील वेल दागिना व पाच हजार रोख रक्कम असा ऐवज चोरून नेत पलायन केले.
या घटनेची माहिती मिळताच शिरूरचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस कर्मचारी विशाल पालवे, पोलिस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. घटनास्थळी सापडलेल्या वस्तूवर चोरट्यांच्या बोटांचे ठसे तपासणीसाठी संबंधित पथकासह श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.
पिंपरखेड येथील यापूर्वी घडलेली जबरी चोरी आणि आताची दरोड्याची घटना अशा दोन्ही प्रकरणामधील चोरट्यांना जेरबंद करण्याचे आवाहन शिरूर पोलिसांसमोर उभे ठाकले असल्याने तपासाला गती देत आरोपींना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जानेवारी महिन्यात पंचतळे परिसरात जाधव कुटुंबियांकडे झालेली जबरी चोरी, पंचतळे, जांबूत, पिंपरखेड परिसरात फोडलेली दुकाने, पिंपरखेड, माळवाडी आणि वडनेर खुर्द या भागात चोरी झालेले शेतकऱ्यांचे कृषिपंप, केबलचोरी, टाकळी हाजी, माळवाडी परिसरातील डाळिंब चोरी, कवठे येथील मंदिरातील दागिने चोरी, जांबूत येथील कळमजाई मंदिरातील देवीच्या दागिन्यांची चोरी अशा अनेक चोरीच्या घटनांचा तपास अद्यापही लागलेला नसून नागरिकांकडून पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.