बांबू लागवडीचा निकष तातडीने बदला, भोरमधील शेतकर्‍यांची मागणी; आ. थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक | पुढारी

बांबू लागवडीचा निकष तातडीने बदला, भोरमधील शेतकर्‍यांची मागणी; आ. थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक

भोर (पुणे), पुढारी वृत्तसेवा : बांबू लागवडीसाठी शासनाने अल्पभूधारकचा निकष बदलावा. भोर तालुक्यात बहुतांशी शेतकर्‍यांच्या नावावर दोन हेक्टरपेक्षा अधिक शेती आहे. त्यामुळे बांबू लागवडीसाठी अल्पभूधारक म्हणजे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकर्‍यांना सदर योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहात आहेत. त्यामुळे सदर योजनेचा निकष राज्य कृषी विभागाने बदलावा, अशी मागणी बहुतांशी शेतकर्‍यांनी आमदार संग्राम थोपटे यांच्याकडे केली. याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आ. थोपटे यांनी दिले.

भोर पंचायत समितीच्या सभागृहात भोर व वेल्हे तालुकास्तरीय खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक आ. थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, तहसीलदार राहुल पारगे, नायब तहसीलदार अजिनाथ गाजरे, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय धनवटे, कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर, शरद धर्माधिकारी, रोहन बाठे, अमोल नलावडे, सतीश चव्हाण, लहू शेलार, विनोद काकडे, सुरेश राजिवडे, संतोष गोळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

ढगे यांनी तालुका कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच खरीप हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. धनवटे यांनी खरीप हंगामासाठी खते व बियाणांच्या नियोजनाची माहिती दिली. या वेळी आ. थोपटे यांचे हस्ते महाडीबीटीअंतर्गत ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. तसेच पीक स्पर्धा विजेत्या शेतकर्‍यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी 2022-23 खरीप भात पीक स्पर्धेत श्रीरंग कोंढाळकर (कांबरे खेबा, प्रथम), बाळू भरगुडे (नेरे, द्वितीय), धोंडिबा मालुसरे (हिर्डोशी, तृतीय), रब्बी ज्वारी पीक स्पर्धेत मिलिंद शिवतरे (उत्रौली, प्रथम), बबन मोरे( मोरवाडी, द्वितीय), रामदास मोरे (सारोळे, तृतीय) यांचा प्रशस्तीपत्रक, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विविध योजनांच्या माहितीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

भोर तालुक्यात बांबू लागवडीसाठी शेतकर्‍यांना 100 बांबूमागे 63 हजार रुपये अनुदान मिळते. रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना पेमेंट मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील अधिकाधिक शेतकर्‍यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन गटविकास अधिकारी धनावडे यांनी केले.

महाबिजचे अधिकारी अनुपस्थित

खरीप आढावा बैठकीला महाबिजचे अधिकारी, बँकेचे अधिकारी, हवामान तज्ञ उपस्थित नसल्यामुळे बियाणांबाबत नियोजन,
पावसाचा अंदाज, खतांचे नियोजन याची महिती शेतकर्‍यांना मिळाली नाही. त्यामुळे आमदार संग्राम थोपटे यांनी अत्यंत कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली.

Back to top button