चक्क! धावत्या लाल परीची निखळली चाके | पुढारी

चक्क! धावत्या लाल परीची निखळली चाके

मंचर (पुणे ) : नारायणगावकडे जाणार्‍या एसटी बसची मागची दोन्ही चाके निखळल्याची घटना पुणे-नाशिक महामागार्वर मंचर जवळील शेवाळवाडी येथे घडली. उर्वरित चार चाकांवर बस काही सेकंद धावली. चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील 35 प्रवासी बचावले. परेल एसटी आगाराची परेल – नारायणगाव बस (एमएच 20 बीएल 3618) पुणे – नाशिक महामार्गाने नारायणगावकडे जात होती. मंचरजवळील शेवाळवाडी परिसरात बस आली असता, चालकाच्या मागील बाजूची दोन्ही चाके अचानक निखळली.

त्यातील एक चाक बसच्या पुढे, तर एक चाक रस्त्याच्या बाजूला ओढ्यात जाऊन पडले. त्यामुळे बस तिरकी झाली. बस तिरकी होऊन रस्त्यावरून जाऊ लागल्याने बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. या घटनेने प्रवाशांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले. दोन्ही चाके निखळल्याने बस घासत पुढे गेली. त्यामुळे रस्त्यावर ठिणग्या उडाल्या. ही बाब चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने प्रसंगावधान राखत बस थांबवली व सर्व प्रवाशांना बाहेर काढले. राजगुरुनगर एसटी आगाराच्या दुरुस्ती पथकाने घटनास्थळी येत बस दुरुस्त केल्याची माहिती मंचर बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक एम. डी. शिंदे यांनी दिली.

Back to top button