पिंपरी : स्मार्ट सिग्नल प्रणालीमुळे वाहतूककोंडी फुटणार ? | पुढारी

पिंपरी : स्मार्ट सिग्नल प्रणालीमुळे वाहतूककोंडी फुटणार ?

हिंजवडी : आयटीनगरी हिंजवडी आणि वाकड परिसरात आता स्मार्ट पद्धतीने वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत आता भूमकर चौकात वनवे करून विनोदेनगर चौकात प्रायोगिक तत्वावर स्मार्ट सिग्नल प्रणाली बसविण्यात आले आहेत. ’इंटेलिजंट स्मार्ट ट्राफिक सिग्नल सिस्टीम’ अशी ही प्रणाली असून, हा प्रयोग यापूर्वी वाकड गावात केला होता. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने येथील विनोदेवस्ती येथेदेखील अशाच पद्धतीने सिग्नल बसविण्यात आलेला आहे.

चौकातील सिग्नल झाले स्मार्ट
चौकात असणारे सिग्नल आणि वाहनांची संख्या यामुळे वाहतूककोंडी होते. अनेक वेळा सिग्नलवर बराच वेळ थांबावे लागते. अगदी समोर काहीच वाहने नसताना दुसरीकडे लाल सिग्नल असतो. यामुळे एका बाजूची वाहतूक खोळंबली जाते. त्यावर पुणे शहरातील स्टार्टअपने उपाय काढला आहे. यासाठी स्मार्ट सिग्नल प्रणाली बनवली आहे. हिंजवडी आणि वाकड भागात आयटीयन्सची संख्या मोठी आहे. यामुळे या कंपन्यांमधील कर्मचार्‍यांना वाहतूककोंडीचा नेहमी सामना करावा लागतो. वाकडच्या मुख्य चौकात तर कितीतरी वेळा वाहतूककोंडीचे चित्र दिसते. पण आता मात्र या चौकात सिग्नलच स्मार्ट झाले आहेत. या चौकात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट इंटेलिजंट सिग्नल सिस्टीम बसवण्यात आली आहे. ही सिस्टीम कॅमेरा आणि सर्वांनी नियंत्रित होते. ज्या लेनवर गाड्यांची संख्या अधिक आहे ते सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व्हरला कळवले जाते. त्यानंतर सर्व्हेर सिग्नलचा कालावधी त्यानुसार बदलतो आणि वाहतूककोंडी सुटण्यास मदत होते.

रुग्णवाहिका आल्यास सिग्नल होणार ग्रीन
स्मार्ट सिग्नल यंत्रणेमुळे या चौकात 70 टक्क्यांहून अधिक सकारात्मक परिणाम दिसत आहे. तसेच, रियल टाईममध्ये सिग्नल व्यवस्थापन केलं जातं. जिथं ट्राफिक जास्त तिथं सिग्नल जास्त वेळ खुला असतो. यामुळे वाहतूककोंडी कमी होते. स्मार्ट सिग्नल बनवताना रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांचा विचार करण्यात आला आहे. म्हणजे रुग्णवाहिका आली तर सिग्नल त्वरीत ग्रीन होतो, रुग्णवाहिका गेल्यावर पुन्हा त्याचे पूर्वीप्रमाणे काम सुरू होते. यासाठी सहायक आयुक्त संजय शिंदे, काकासाहेब डोळे यांच्यासह वाहतूक विभागाच्या अधिकार्‍यांनी पुढाकार घेतला होता

इंटेलिजंट स्मार्ट ट्राफिक सिग्नल सिस्टीमची काम करण्याची पद्धत

1जिथे ही प्रणाली बसवण्यात येईल त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कमेर्‍याद्वारे त्या सिग्नल जवळ असलेल्या वाहनांची संख्या नोंदली जाणार आहे. संबंधित डेटा सिस्टिममध्ये घेऊन त्यानुसार सिग्नल लाल किंवा हिरवा दिला जाणार आहे. ही यंत्रणा सिस्टीमनुसार होणार असल्याने यात चुकीची शक्यता कमी आहे.

2 यामुळे वाहतूक विभागास नवीन संजीवनी मिळेल. शहरातील इतर चौकांतदेखील असीच यंत्रणा असावी यासाठी प्रशासन आग्रही राहणार असणार आहे. येथील ’डेटा मार्फसी टेक्नॉलॉजी प्रा. लि.’ या कंपनीने ही स्टार्ट अप प्रणाली विकसित केला आहे.

Back to top button