अरे या फुगेवाल्यांना कोणीतरी आवर घाला रे...! | पुढारी

अरे या फुगेवाल्यांना कोणीतरी आवर घाला रे...!

लोणावळा : कुमार चौक ते मावळा पुतळा चौक दरम्यान फुगे विकणारी लहान मुले व महिला यांनी अक्षरशः दुकानदार, पर्यटक व वाहनचालक यांना हैराण केले आहे. फुगे विकायचा नावाखाली वाहनांवर हात मारत भिक मागायची, गाड्याच्या मागे पळायचे, पर्यटक काही वस्तू घेत असतील तर त्यांच्या मागे लागायचे, हातातील वस्तू ओढायच्या असले प्रकार सुरू आहेत.

लोणावळ्याविषयी पर्यटकांमध्ये नकारात्मक संदेश
या फुगेवाल्यांनी लोणावळा शहरात राहण्यासाठी सध्या कुमार रिसॉर्टच्या इमारतीत असलेल्या दुकांनासमोरील जागा आणि मॅकडोनाल्ड समोरील फूटपाथ निवडला आहे. रात्रभर त्यांचा आरडाओरडा सुरू असतो. अतिशय घाण त्यांनी त्याठिकाणी केली आहे. अंगावरील कपडे व अंथरुण तेथेच टाकायचे, खाण्याचे उष्टे अन्न, पुठ्ठे सर्वत्र पडलेले असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
शहराचे प्रवेशद्वार असलेल्या चौकातच हे चित्र असल्याचे त्यांचा नकारात्मक संदेश पर्यटकांमध्ये जात आहे. फुगे हातात घेऊन रस्त्याने फिरणारी मुले व महिला यामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकदेखील हैराण झाले आहेत. ही मंडळी कोणाच्याही मागे पळत सुटतात, वाहनांच्या काचांवर हात मारतात, गाडीवर हात मारतात, गाडीची काच उघडी असले तर थेट आतमध्ये हात घालतात व पर्यटकांना त्रास देत आहेत.

 गाड्यांच्या मागे धावल्याने अपघाताची भीती
या प्रकारामुळे या भागात प्रवास करताना त्रास होतोच, पण अपघाताची शक्यता सुद्धा वाढलेली आहे. फुगे विक्री करणारी ही मंडळी चालू गाड्यांच्या अधिमधी कसेही पळत सुटतात, त्यामुळे त्यांना गाडीची धडक बसण्याची शक्यता जास्त असते. जर असा अपघात झाला तर त्यात चूक कोणाची हे बघितलं जाणार नाही. त्या अपघातासाठी वाहनचालकाला दोषी धरलं जाणार. आणि त्यामुळे त्याच्यावर मनःस्ताप करण्याची वेळ येऊ शकते.

फुगे विकणार्‍या मुलांचा बंदोबस्त करा
मागील काळात माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, तत्कालीन मुख्याधिकारी सचिन पवार व त्यानंतर रवी पवार तसेच पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी या सर्वांचा बंदोबस्त करत त्यांना गावाला पाठवून दिले होते. आता मात्र, त्यांची फौज पुन्हा शहरात दाखल झाली आहे. मुले व महिलांना भिक मागायला लावत पुरुष मंडळी आलेल्या पैशातून दारु व अन्य नशा करत भांडताना दिसतात. अनेक वेळा एकमेकावर दगडफेक करण्याच्या तसेच हातानी, काठीने एकमेंकाला मारत भांडण करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. लोणावळा नगर परिषदेने व लोणावळा शहर पोलिसांनी या फुगेवाल्यांचा बंदोबस्त करत कुमार चौकाला दिलासा द्यावा, अशी मागणी या भागातील दुकानदार व नागरिक करत आहेत.

Back to top button