भंगार विक्रीतून पिंपरी-चिंचवड पालिकेला 1 कोटी 10 लाख | पुढारी

भंगार विक्रीतून पिंपरी-चिंचवड पालिकेला 1 कोटी 10 लाख

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेची जुनी व वापरात नसलेल्या एकूण 120 वाहनांचा लिलाव करण्यात आला आहे. या भंगार वाहनांच्या लिलावातून पालिकेस 1 कोटी 9 लाख 69 हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेची अनेक वाहने वापरात नाहीत. ती भंगार वाहने एका जागी वर्षेभर ठेवल्याने गंजत आहेत. अनेक महिने धूळ खात पडल्याने ती वाहने खराब होत आहेत तसेच, ती वाहने पालिकेच्या अनेक इमारतीच्या पार्किंगमध्ये पडून असल्याने पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. अखेर, ती भंगार वाहने विक्रीचा निर्णय पालिकेच्या यांत्रिकी विभागाने घेतला.

पालिकेकडे अशी 122 वाहने होती. पालिकेने त्या वाहनांचा 75 लाख 17 हजार 500 रुपये दर निविदेमध्ये दिला होता. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या दरात 10 टक्के वाढ करून वाहनांचा ई-लिलाव करण्यात आला. त्यानुसार 92 लाख 96 हजार असा 23.66 टक्के दर प्राप्त झाला. त्यामधील 122 वाहनांपैकी दोन वाहनांना लघुत्तम दरापेक्षा कमी दर प्राप्त झाला आहे. त्यामुळे ती दोन वाहने वगळून 120 वाहनांची 92 लाख 96 हजार रुपये तसेच 18 टक्के जीएसटी धरून 1 कोटी 9 लाख 69 हजार 297 रुपयांना विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 120 वाहनांची विक्री करण्यात येणार आहे.

त्या बदल्यात पालिकेला 1 कोटी 9 लाख 69 हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. हे पैसे कोषागरात भरून वाहने बोलीदारांना देण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीमध्ये मान्यता दिली आहे. तसेच, शहरातील 18 मीटर व त्यावरील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या कामासाठी तांत्रिक सल्लागार समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आली.

पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागांतर्गत पशुवैद्यकीय दवाखाने व प्राणिसंग्रालय पशुवैद्यक, क्यूरेटर व पशुवैद्यकीय अधिकारी या अभिनामाचे पदावर दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात 3 महिने कालावधीसाठी मुदतवाढ देऊन नियुक्तीस मान्यता देण्यात आली. चिखली येथे नव्याने होणार्‍या टाऊन हॉलकरीता उच्चदाब वीजपुरवठा घेण्यासाठी महावितरण कंपनीला अनामत रक्कम, करारनामा व वीजपर्यवेक्षक शुल्क अदा करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच, स्थापत्य प्रकल्प विभागाकडील कामाच्या तरतुदीमध्ये वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ब आणि ई क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील क्रीडा विषयक सुविधांची स्थापत्य विषयक कामे करण्यास मान्यता देण्यात आली.

मानधनावर 209 शिक्षकांची नेमणूक
येत्या सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षाकरिता एकत्रित मानधनावर 209 शिक्षक नेमणुकीस मान्यता देण्यात आली. त्यांना दरमहा 27 हजार 500 मानधन देण्यात येणार आहे. एका महिन्यास एकूण 57 लाख 47 हजार 500 खर्च आहे. अकरा महिन्यांचा एकूण 6 कोटी 32 लाख 22 हजार 500 इतका खर्च आहे. त्यात माध्यमिक विद्यालयाच्या मराठी माध्यमाचे 184 आणि उर्दु माध्यमाचे 25 शिक्षक अशी संख्या आहे.

Back to top button