पुणे : शहरात आरोग्य सेवेचा विस्तार ; उपनगरांसह समाविष्ट गावांना मिळणार 96 आरोग्यवर्धिनी केंद्रे | पुढारी

पुणे : शहरात आरोग्य सेवेचा विस्तार ; उपनगरांसह समाविष्ट गावांना मिळणार 96 आरोग्यवर्धिनी केंद्रे

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे महापालिकेमधील समाविष्ट गावांमध्ये आरोग्य सेवा पुरवता याव्यात, यासाठी नवीन आर्थिक वर्षामध्ये 96 नवीन आरोग्यवर्धिनी केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. केंद्रांसाठी शासनाकडून देखभाल दुरुस्ती, फर्निचर, मनुष्यबळ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे, यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्रांसाठी जागा महापालिकेतर्फे दिली जाणार आहे.

पुणे शहरात महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय, नायडू सांसर्गिक रुग्णालय, 54 दवाखाने आणि 19 प्रसूतिगृहे कार्यान्वित आहेत. मात्र, उपनगरांमधील नागरिकांना प्राथमिक उपचारांसाठी दरवेळी शहरात येणे शक्य नसते. अशावेळी आरोग्य सुविधा निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत केंद्रे निर्माण 29 आरोग्यवर्धिनी करण्यात आली असून, नवीन 96 केंद्रे प्रस्तावित आहेत. एका आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये एक डॉक्टर, दोन नर्स, एक ड्रेसर आणि एक फार्मासिस्ट यांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

शहरात 10 पॉलिक्लिनिक सुरू केली जाणार आहेत. अडीच ते तीन लाख लोकसंख्येसाठी 1 पॉलिक्लिनिक मंजूर करण्यात आले आहे. क्लिनिकमध्ये बाह्यरुग्ण सेवा पुरवली जाणार आहे. पॉलिक्लिनिकमध्ये वैद्यकतज्ज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग, नेत्ररोग, त्वचाविज्ञान, मानसोपचार, ईएनटी विशेषतज्ज्ञ इत्यादींच्या सेवा उपलब्ध असतील. पॉलिक्लिनिकची वेळ सायंकाळी 4 तास राहील.
                                – डॉ. भगवान पवार, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

Back to top button