विहिरी, कूपनलिकांच्या पाण्यालाही दुर्गंधी | पुढारी

विहिरी, कूपनलिकांच्या पाण्यालाही दुर्गंधी

बावधन : पुढारी वृत्तसेवा :  राम नदीमध्ये सांडपाणी व मैलापाणी सोडल्यामुळे परिसरात असलेल्या विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्यावर दुष्परिणाम झाला आहे. हे पाणी दूषित झाल्याने त्याची दुर्गंधी सुटली आहे. यामुळे विहिरींतील पाणी जनावरांना पिण्यासाठीदेखील देता येत नसल्याचे स्थानिक शेतकर्‍यांनी सांगितले. राम नदीमध्ये जोपर्यंत सांडपाणी सोडले जात नव्हते, तोपर्यंत परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी स्वच्छ होते. परंतु, नदीत सध्या सांडपाणी व मैलापाणी सोडले जात असल्याने त्याचा निचरा या भागातील विहिरी व कूपनलिकांमध्ये होत आहे.

या पाण्याचा उपयोग जनावरांना पिण्यासाठीदेखील होत नसल्याने त्यावर शेवाळाचा थर आला आहे. भूगावमध्ये नदीच्या कडेला स्मशानभूमी आहे. या ठिकाणी अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना नदीतील दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नदीपात्रात जलपर्णी वाढू लागली असल्याचे नागरिकांनी सांगितले. नदीतील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भुकूम, भूगाव व बावधन परिसरामध्ये राम नदीच्या कडेला अनेक जुन्या विहिरी असून काही वर्षांपूर्वी या भागात शेतकर्‍यांनी कूपनलिका खोदल्या आहेत. पूर्वी या विहिरींचे पाणी नागरिक पिण्यासाठी व शेतीसाठी वापरत असत. परंतु, आता नदीचे पाणी दूषित झाले असून, विहिरी व कूपनलिकांच्या पाण्यालाही दुर्गंधी सुटल्याचे नागरिकांनी सांगितले.

Back to top button