पाच मुलींना वाचविणारा देवदूत गहिवरला ! दोघींना वाचविता न आल्याची खंत | पुढारी

पाच मुलींना वाचविणारा देवदूत गहिवरला ! दोघींना वाचविता न आल्याची खंत

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  स्वत:च्या जिवाची पर्वा न करता खडकवासला धरणातील खोल पाण्यात उडी मारून बुडणार्‍या पाच मुलींचे प्राण वाचविण्यात यश आले. मात्र, असह्य परिस्थितीमुळे दोन मुलींचा डोळ्यांसमोर बुडून अंत झाल्याने गोर्‍हे खुर्द, सिंहगड भागातील देवदूतांना गहिवरून आले. ’त्या दोघींना वाचवता आले असते, तर बरे झाले असते,’ असे सांगताना संजय माताळे यांना अश्रू अनावर झाले. पानशेत रस्त्यावरील गोर्‍हे खुर्द येथील खडकवासला धरणाच्या पाणलोटक्षेत्रात सोमवारी (दि. 15) अंघोळीसाठी गेलेल्या सात मुली बुडत असताना त्यांना वाचविण्यासाठी गोहे खुर्द येथील शेतकरी संजय सीताराम माताळे यांनी जिवाची बाजी लावली, तर मालखेडचे माजी सरपंच राजेंद्र जोरी, पोलिस पाटील कालिदास माताळे, अतुल भांगरे, गणेश माताळे, शिवाजी माताळे व रमेश भामे, सचिन काळोखे यांनीही शर्थीचे प्रयत्न केले. त्याबद्दल त्यांच्यासह खानापूर आरोग्य केंद्राचे डॉक्टर व हवेली पोलिसांचा गोर्‍हे खुर्द ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

या वेळी दोन मुलींचे प्राण वाचविता आले नाहीत, असे सांगताना संजय माताळे यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे, हवेलीचे माजी उपसभापती किसनराव जोरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे त्रिंबक मोकाशी, सरपंच वनिता भांगरे, माजी सरपंच लक्ष्मण माताळे, नंदकुमार जावळकर आदींसह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.धरणात बुडत असलेल्या मुली डोळ्यांसमोर तरंगू लागल्या. मृत्यूने गाठण्याआधी त्यांना पाण्यातून बाहेर काढणे आवश्यक होते. त्यामुळे जिवाची पर्वा केली नाही. मात्र, दोन मुली डोळ्यांसमोरच बुडून खोल पाण्यात गेल्या. त्यांना वाचविता आले असते तर बरे झाले असते.
                                                         – संजय माताळे, सन्मानार्थी

मुलींना बेशुद्धावस्थेत धरणतीरावर आणले. त्या जिवंत आहेत का? हे कळत नव्हते. त्यांच्या पोटातून पाणी बाहेर काढताना शरीर थरथर कापत होते. पाणी काढून सर्व मुलींना दवाखान्यात घेऊन गेलो.
                                                   – राजेंद्र जोरी, माजी सरपंच, मालखेड

Back to top button