उजनीतील पक्ष्यांच्या संख्येत घट ; प्रदूषण परदेशी पाहुण्यांच्या मुळावर | पुढारी

उजनीतील पक्ष्यांच्या संख्येत घट ; प्रदूषण परदेशी पाहुण्यांच्या मुळावर

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा : उजनीतील प्रदूषण शेतकर्‍यांसह देशी-विदेशी पक्ष्यांच्याही मुळावर उठले आहे. वारंवार बदलते हवामानही यास कारणीभूत ठरत आहे. परिणामी, उजनी जलाशयावर येणारे स्थलांतरित पक्षी उशिरा येऊन लवकर परतीच्या प्रवासाला निघत आहेत. यंदा फ्लेमिंगो, चक्रवाक बदके, पट्टकदंब, मत्स्यघार आदी पक्ष्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. उजनी धरणातील अथांग पसरलेल्या पाणीसाठ्यात लहान मासे, किडे, गवत हे पक्ष्यांचे असणारे खाद्य मुबलक प्रमाणात निर्माण होते. धरणातील पाणीसाठा कमी होऊन पाणथळ जागा तयार होण्यास सुरुवात होते.

नेमक्या या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात देशी-विदेशी पक्ष्यांची मांदियाळी जमण्यास सुरवात होते. पक्ष्यांमुळे उजनीचे महत्त्व वाढलेले असले तरी त्यांच्या सुरक्षेसंदर्भात शासकीय पातळीवर कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसून येत नाहीत. उजनी धरण परिसरात देश-विदेशातून हजारो किलोमीटर अंतर पार करून रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यासह शेकडो विविध जातीचे पक्षी आवर्जून हजेरी लावतात, यामुळे अनेक पक्षिप्रेमी, पर्यटक व पक्षितज्ज्ञांची पावले साहजिकच उजनीकडे वळतात. धरण भरून शांत झाल्यावर पाण्यावर प्रदूषित पाण्याचा हिरवट रंग तयार होतो. या वेळी पाण्याशी समरस होणारे पक्षी येथे थांबतात व बाकीचे पक्षी एप्रिल-मेच्या दरम्यान परतीच्या प्रवासाला लागतात.

हवामान बदल, वाढते पाणी प्रदूषण, यामुळे पाण्याची प्रत बिघडत चालली आहे. धरणातील पाणी राखून ठेवण्याविषयी नियोजनाच्या अभावामुळे उजनी पाणलोट परिसरात स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वेळीच उपाययोजना करण्यात हयगय केल्यास भविष्यात आपल्याला जगणे कष्टदायक ठरेल.
– डॉ. अरविंद कुंभार, पक्षी व पर्यावरण अभ्यासक

Back to top button