गृहमंत्री फडणवीसांचा मेसेज आला; तरुणाचे प्राण वाचले | पुढारी

गृहमंत्री फडणवीसांचा मेसेज आला; तरुणाचे प्राण वाचले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एका तरुणाने व्हॉट्सअ‍ॅप मेसेजच्या माध्यमातून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्याच्या ओळखीतील एकाने हा मेसेज उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखविला. त्यांनी तत्काळ पोलिस आयुक्त रितेश कुमारांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यानंतर सूत्रे गतिमान करीत स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित तरुणाला शोधून काढले. दत्तवाडी येथील लक्ष्मीनगर परिसरात 32 वर्षीय तरुण पत्नी, आई, मुलगा व बहीण यांच्यासह एकत्र वास्तव्यास आहे. गृहसजावटीचा (इंटेरिअर डिझाइन) त्याचा व्यवसाय असून, त्यासाठी लागणारे सर्व साहित्य तो पुरविण्याचे काम करतो.

हे काम तो कमिशन तत्त्वावर करतो. त्यामुळे एकाकडून घेतलेल्या सामानाचे पैसे देण्यासाठी त्याने दुसर्‍याकडून पैसे घेतले तसेच मालाची उधारी झाली. त्यातून पैशासाठी अनेकांनी तगादा लावला. लोकांचे मोठे कर्ज झाल्यामुळे तो नैराश्यात गेला. त्यातूनच त्याने जीवन संपविण्याचा विचार केला. तसा मेसेज तयार करून त्याने ओळखीतील काही जणांना पाठविला होता. दरम्यान, गृहमंत्री फडणवीस सोमवारी (दि. 16) पुणे दौर्‍यावर होते. त्या वेळी त्यांच्या परिचयातील एकाने हा मेसेज त्यांना दाखविला. तत्काळ त्यांनी याची माहिती पोलिस आयुक्तांना दिली. त्यानंतर अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे व्यावसायिक तरुणाच्या घराचा पत्ता शोधून काढला.

दत्तवाडी पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. त्यांनी तरुणाला पोलिस ठाण्यात आणून त्याची चौकशी करून अडचणी समजावून घेतल्या. त्यानंतर त्याचे समुपदेशन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
.

Back to top button