तीन हिरकणींनी सर केले मरहनी शिखर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ग्रेट हिमायलन नॅशनल पार्कच्या इकोझोनमधील पेखरी गावातून पुढे जाणार्या मरहनी शिखरावर तीन हिरकणींनी यशस्वी चढाई केली आहे. सातवर्षीय इरा सुब्रमणियन आणि तिच्या दोन मैत्रिणी ऋतिका आणि सान्वी यांनी ही कामगिरी केली.
याबाबत बोलताना ईरा म्हणाली की, गिर्यारोहणासाठी आमचे मार्गदर्शक वेद बेली यांनी परवानगी घेऊन दिली. संपूर्ण प्रवासात अडचणी येऊनसुद्धा भीती वाटली नाही. तंबूत राहणे, स्लीपिंग बॅगमध्ये झोपणे, बॉनफायर, बर्फात खेळणे, विविध झाडे आणि पक्षी पाहणे, एकत्र राहणे या सगळ्याचा आम्ही आनंद घेतला. हा ट्रेक आम्हाला निसर्गाच्या आणखी जवळ घेऊन जाणारा होता.
शारीरिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ बनविण्यासाठी मुलींना ट्रेकसाठी नेण्याचे नियोजन आम्ही केले होते. इरा, ऋतिका आणि सान्वी या तिघींनीही पुण्यात दोन महिन्यांच्या सरावाव्यतिरिक्त अन्य कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण न घेता दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर हा ट्रेक पूर्ण केला, याचे आम्हाला विशेष कौतुक आहे.
– श्रद्धा सुब्रमणियन (इराची आई)10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हिमालयात ट्रेकिंगला घेऊन जाताना विशेष काळजी घेण्याची गरज असते. ट्रेकला निघण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेण्यासह गिर्यारोहणाच्या ठिकाणाच्या हवामानाचा अंदाज घेत अनुरूप वस्त्रे व उपकरणे सोबत घ्यावीत. नियमितपणे चालणे किंवा धावणे आपल्याला ट्रेकिंगसाठी सक्षम होण्यास मदत करेल.
– श्रीकांत धुमाळे, संस्थापक, सागरमाथा अॅडव्हेंचर्स