पुण्यातील रिंगरोड, मेट्रो जागेबाबत आज निर्णय | पुढारी

पुण्यातील रिंगरोड, मेट्रो जागेबाबत आज निर्णय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत 82 किलोमीटर लांबीच्या रिंगरोड प्रकल्पासाठी सुधारित मान्यता घेणे तसेच प्रकल्प टप्प्याटप्प्याने पीपीपी तत्त्वाने राबविण्यासाठी मान्यता घेण्याचा प्रस्ताव पीएमआरडीएच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक उद्या बुधवारी मुंबईत होणार आहे.
या बैठकीत एकूण 14 प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत.

2023- 24 या आर्थिक वर्षातील प्रस्तावित अर्थसंकल्पही मांडण्यात येणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पासाठी शासकीय दुग्ध योजनेची जागा तसेच अन्य जागा दीर्घ मुदतीचे भाडेतत्त्वावर देण्याचे अधिकार महानगर आयुक्तांना देण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात येणार आहे. प्राधिकरणाच्या हद्दीतील 34 गावे महानगरपालिकेत समाविष्ट झाली आहेत. तेथील जमा झालेल्या विकास शुल्कापैकी काही निधी महापालिकेला देण्याबाबतचा प्रस्तावही चर्चेसाठी ठेवण्यात
आला आहे.

Back to top button