मंचर : शेतकर्‍यांना उत्तम बियाणे, खतांचा पुरवठा करावा | पुढारी

मंचर : शेतकर्‍यांना उत्तम बियाणे, खतांचा पुरवठा करावा

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करून द्यावे. खते, औषधांचा शेतकर्‍यांच्या मागणीनुसार पुरवठा करावा. जबरदस्ती करून इतर खते घेण्यासाठी भाग पाडू नये. असा प्रकार घडल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई करावी, अशी सूचना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे पंचायत समिती सभागृहात खरीप हंगाम नियोजन व आढावा सभा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे, तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी, मनोज कोल्हे, एन. आर. गवारी, जिल्हा खत विक्री असोसिएशनचे अध्यक्ष महेश मोरे आदी उपस्थित होते.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, रांजणगाव येथे असलेली वेफर्सची कंपनी बंद आहे. या कंपनीने बटाटा खरेदी कमी केली आहे. कंपनीने बटाटा खरेदी केला नाही तर सातगाव पठारावरील शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. बटाटा उत्पादक शेतकर्‍यांसाठी ही कंपनी सुरू राहणे आवश्यक आहे. यासाठी कंपनी व्यवस्थापनाशी लवकरच चर्चा करू. आंबेगावच्या आदिवासी भागात या वर्षी काही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले आहे. हे पीक वाढावे यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे.

माती परीक्षणासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रयोगशाळेचा वापर करा. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी आंबेगाव तालुक्यात दोन शेतकरी मेळावे घेतले जावेत. एक मेळावा आदिवासी भागात व एक मेळावा पूर्व भागात व्हावा. यावर्षी पाऊस कमी पडेल असे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. सध्या बहुतेक धरणांतील पाणी कमी झाले आहे. पाऊस लांबल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. याला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. या भागात आंबा लागवड वाढावी यासाठी स्वतंत्र योजना केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Back to top button