आंबेगाव तालुक्यातील सुपेवाडी ते वैदवाडी रस्त्याची दुरवस्था | पुढारी

आंबेगाव तालुक्यातील सुपेवाडी ते वैदवाडी रस्त्याची दुरवस्था

वाडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खेड, आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सुपेवाडी ते वैदवाडी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेली कित्येक वर्षे प्रशासन मात्र डोळेझाक करीत आहे. खेड आणि आंबेगाव तालुक्याच्या सीमेवरून भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणारा हा रस्ता आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून, या मार्गावर सुपेवाडी, शिनोली, वाडा, गडदुडेवी, सयारखळे, गाडेकरवाडी, भागितवाडी, वैदवाडी, भीमाशंकर, अशी अनेक गावे जोडली गेली आहेत. या मार्गावर वाहतूक करणे जिकिरीचे होत आहे.

जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता डोंगराळ भागातून जात असून, अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेल्याने काही ठिकाणी फक्त मातीचा रस्ता उरला आहे. मोठ्या गावांना जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा असून, अनेकवेळा अत्यावश्यक प्रसंगी या रस्त्यावरून जाताना छोटे-मोठे अपघात होत आहेत. अनेक गावांना याचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा मागणी करूनही प्रशासन या आदिवासी भागातील गावांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून, नागरिक संतप्त झाले आहेत. घोडेगाव सार्वजनिक विभाग याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक सांगत आहेत.

रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान होत असून, छोटे-मोठे अपघात होत आहेत. प्रशासनाने जातीने लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी.

                 – काळुराम सुपे, माजी सभापती व सदस्य, ग्रामपंचायत वाडा

Back to top button