कुसेगावच्या शेतकर्‍याने दूध व्यवसायातून साधली प्रगती | पुढारी

कुसेगावच्या शेतकर्‍याने दूध व्यवसायातून साधली प्रगती

पाटस (ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : कुसेगाव भोसलेवाडी येथील गणेश भोसले यांनी शेती सोडून दूध व्यवसाय करीत वर्षाला 15 लाख रुपये कमवतात. व्यवसायाने साथ दिल्याने त्यांनी ऊसशेती व गाडीभाड्याचा व्यवसाय सोडून दिला आहे. गणेश भोसले यांनी पाच गुंठ्यांत ओपन गायीचा गोठा तयार केला आहे. वर्षाला तीस लाख रुपयांची उलाढाल होते. त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे. मात्र ते गाडीचा भाडे व्यवसाय करीत होते. नेहमीच शेतकर्‍यांचे दूध वाहतो, आपणच दूध व्यवसाय करावा, असा विचार करून दोन वर्षांपूर्वी दूध व्यवसाय सुरू केला. नवीन व्यवसायात उतरल्यानंतर आलेल्या कोरोना आजारात प्रारंभीच दणका बसला. मात्र, तरीही नेटाने व्यवसाय केल्याने प्रगतीची वाट सापडली.

पूर्वी दोन एकर ऊसात वर्षाला दीड लाख रुपये मिळत होते. मात्र, कोरोना काळात गाईंच्या किमती कमी झाल्याने सुरुवातीला पाच गाईं विकत घेऊन छोट्याशा गोठ्यात दूध व्यवसाय सुरू केला. पै- पाहुण्यांकडून गाईंसाठी भांडवल घेतले होते. दीड वर्षातच गाईंची संख्या 32 वर नेली.

गोठ्यातील व्यवस्था

पाच गुंठ्यांत मोकळ्या गाईं वावरू शकतील, अशी जागा आहे. गोठ्यात लाईट, पंखे, स्प्रिंकलर, संगीत साउंडसिस्टिम, सीसीटीव्ही सुविधा आहे. सकाळी 6 ते रात्री 6 वाजेपर्यंत गाईं मोकळ्या वावरतात. दूध काढताना त्यांना बांधण्यात येते. खाण्यासाठी ऊस विकत घेतात. मका व हत्तीगवत दोन एकरांमध्ये केले आहे.

मका, ऊस, गवत बारीक करून एकत्र मिसळून गाईंना सकाळ व संध्याकाळी देतात. गोळी, भुसा, पेंड दिल्याने दूध उत्पादनात वाढ होते. गोठ्यात 20 हायब्रीड तर 2 गावरान गाई व 10 वासरे आहेत. 20 गाईंचे दूध काढण्यासाठी मशीन असल्याने संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत सर्व गाईंचे दूध काढून होते.

उत्पन्न व खर्च

गाईंची सरासरी किंमत प्रत्येकी एक लाख रुपये आहे. 20 गाईंचे सरासरी 200 लिटर दररोज दूध मिळते. दुधाला प्रतिलिटर 40 रुपये भाव आहे. महिन्याला अडीच लाख तर वर्षाला 30 लाख रुपये मिळतात. महिन्याला 32 गाईंना 70 हजार रुपयांची गोळी, भुसा पेंड लागते. त्याचा वर्षाला 8 लाख 40 हजार रुपये खर्च होतो. कामगारांच्या पगारासाठी वर्षाला दीड लाख रुपये जातात. डॉक्टरसाठी वर्षाला 1 लाख रुपये, ऊसासाठी 2 लाख 40 हजार रुपये तर मका, हत्तीगवतासाठी दीड लाख रुपयांचा खर्च येतो. एकूण 15 लाख रुपये खर्च होतो व वर्षाला 15 लाख रुपये सुटतात.

Back to top button