

वर्षा कांबळे
पिंपरी : हॅपी बर्थडे, हॅपी अॅनिवर्सरी अशा टॅगची जागा घेतली आहे आता मायबोली मराठीमधल्या भन्नाट केकवरील टॅगने. आता फक्त व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर फोटो व व्हिडीओवर दिल्या जाणार्या कमेंट आता टॅगवर अवतरताना दिसत आहेत. तरुणाईकडून मनोरंजनाच्या नवनव्या युक्त्या शोधल्या जात आहेत. टॅगचा वापर पण ट्रेंड झाला आहे. इतकंच नाही, तर या ट्रेंडवरील भन्नाट नावे वाचून तुम्हाला हसू येईल. हल्ली कोणत्याही केक विक्रेत्यांकडे गेलात की तुम्हाला टॅगचे नवनवीन प्रकार पहायला मिळतील.
यामध्ये हिला विचारून सांगतो, लवंगी मिर्ची, काय माणूस काय वाढदिवस, काय पार्टी, सेल्फि क्विन, बायकोचा बैल, बेरोजगार, सरपंच, कारभारीण, फुकट तिथे प्रकट, गुंठामंत्री, बिडी काडी स्टाँग बॉडी, चला बसू, आलोच पाच मिनिटात, पिल्लू, अप्सरा, ओ शेठ, पापा की परी, गर्लफ्रेंडचा बैल, लाडाची बायको, चहाप्रेमी अशा प्रकारच्या भन्नाट कमेंटच्या टॅगची चलती सुरू आहे. एकमेकांना चिडविणे हा तर तरुणाईचा नेहमीचा उद्योग असतो. अशाप्रकारे एखादे सरप्राईज देणे ही मजा काहीऔरच असते.
वाढदिवस साजरा करणे म्हणजे काहीतरी अविस्मरणीय व हटके असे पाहिजे. आजकाल सोशल मीडियाच्या जगात कशाचे पण सेलिब्रेशन असो त्याचे फोटो लगेच सोशल मीडियावर टाकण्याची शर्यत सुरू असते. एकाचवेळी हजारो लोकांपर्यंत पोहचण्याचा मार्ग म्हणजे सोशल मीडिया. यावर काहीतरी मजेशीर टाकायचे किती कमेंट पडतात हे तपासणे ही प्रत्येकाची सवय झाली आहे. तरुणाई म्हणजे फुल टू धमाल किंवा पागलपंती करण्यामध्ये सर्वात पुढे असते. भन्नाट नावाच्या अशा टॅगमुळे वाढदिवसाचा आनंदही द्विगुणित होतो आणि मजामस्ती धमालही करायला भेटते.