मोठी बातमी : पुणे डीआरडीओ हनीट्रॅप प्रकरण; कुरुलकरची होणार पोलिग्राफ टेस्ट! | पुढारी

मोठी बातमी : पुणे डीआरडीओ हनीट्रॅप प्रकरण; कुरुलकरची होणार पोलिग्राफ टेस्ट!

दिनेश गुप्ता/ महेंद्र कांबळे

पुणे : पाकिस्तानी ललनाच्या मोहजालात (हनीट्रॅप) अडकून संरक्षण दलाची माहिती पुरवणार्‍या डीआरडीओतील शास्त्रज्ञ प्रमोद मोरेश्वर कुरुलकर याचा एटीएसने फास आवळला आहे. तोंड उघडण्यासाठी कुरुलकरची पोलिग्राफ टेस्ट घेण्याची परवानगी मिळवली असून, येत्या दोन दिवसांत ही टेस्ट केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिग्राफ टेस्टनंतरही कुरुलकरने तोंड उघडले नाही, तर त्याची नार्को टेस्टदेखील घेण्याची तयारी एटीएसने चालवली असून, त्यासंबंधीच्या सर्व परवानग्या मिळवल्या असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मागील पंधरा दिवसांपासून दिघी येथील डीआरडीओचे शास्त्रज्ञ कुरुलकर एटीएस कोठडीत आहे. संरक्षण दलाची गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंट यांना पुरविल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महासंचालकांच्या परवानगीने एटीएसकडे गुन्हा दाखल केला होता.

कुरुलकरची कोठडी सोमवारी संपल्याने त्यास आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता अनेक खळबळजनक माहिती समोर आली. तपास यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुरुलकर अनेक माहिती लपवून तपास यंत्रणेची दिशाभूल करीत आहे. एका कुख्यात गुन्हेगाराप्रमाणे कुरुलकर तोंड उघडत नाही. पुरावे व माहिती मिळूनही त्याची कबुली देत नसल्याने त्याची पोलिग्राफ टेस्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, त्याची परवानगीही देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

“झारा ” नावाचं मायाजाल….

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुरुलकर एक नव्हे, तर चार चार मोबाईल वापरत होता. त्याच्या मोबाइलमधील अनेक ” राज ” उघड झाले आहे. पाकिस्तानी एजंट असलेल्या झारादास गुप्ता या ललनाचे “झारा” या टोपण नावाने अनेकदा संवाद झालेला आहे. तपास अधिकार्‍यांनी या नंबरबाबत गुगल व इंस्टाग्राम यांच्याकडून अहवालही घेतला असून, तो नंबर पाकिस्तानचाच असल्याचे उघड झाले आहे. या क्रमांकावरून युजर कोडमध्ये 9 क्रमांकावर बोलणे झाले असून, त्या क्रमांकाचा आयपी अ‍ॅड्रेस पाकिस्तानचा असल्याचे सिद्ध झाले आहे.

ब्लॉक क्रमांक निघाला नागपूरचा….

तपास यंत्रणेने केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये पाकिस्तानी एजंट झारादास गुप्ता हिने जेव्हा तिचा नंबर कुरुलकरने ब्लॉक केला. त्यानंतर तिला कुरुलकरकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसताच तिने दुसर्‍या नंबरवरून मेसेज केला की, “तू मला ब्लॉक का केले ?” या क्रमांकाची चौकशी केली असता तो नंबर नागपूर येथील एका तरुणाच्या नावावर असल्याचे समोर आले. याबाबत नागपूर एटीएसने चौकशी केली असता तो नंबर हवाई दलातील निखिल शेंडे वापरात असल्याचे समजले. याच दरम्यान एटीएसने नोटीस बजावून जबाब घेतला असता खळबळजनक माहिती समोर आली.

‘त्या’ मोबाईलमध्ये सापडले बरेच काही

कुरुलकर वापरत असलेल्या एका मोबाईलमध्ये संरक्षण दलाची चित्रे, डॉक्युमेंट्स, व्हिडिओ, ऑडिओ, इन्स्टंट मॅसेजेस, महिलांचे अर्धनग्न फोटोज तर दुसर्‍या मोबाईलमध्ये पाकिस्तानी एजंट झारा हिच्या नावाचा व्हॉट्सअप चॅटिंग व पर्सनल व्हिडिओ मिळून आले.

Back to top button