पुणे : बालभवने फुलली... मुले खेळू लागली ! | पुढारी

पुणे : बालभवने फुलली... मुले खेळू लागली !

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोणी मैदानी खेळांत रमलेले, तर कोणी ओरिगामी कला शिकण्यात… कोणी क्रिकेट खेळताना दिसेल, तर कोणी चित्रकलेच्या दुनियेत रममाण झालेले… उन्हाळ्याच्या सुटीत लहान मुले शहरातील विविध बालभवनांमध्ये खेळण्याचा, मनसोक्त बागडण्याचा आणि विविध कला शिक्षणाचा आनंद लुटत असून, बालभवनांमध्ये सुरू असलेल्या शिबिरांमध्ये मुले उत्साहाने सहभागी झाली आहेत. नृत्यापासून चित्रकलेपर्यंत विविध उपक्रम बालभवनांद्वारे मुलांसाठी घेतले जात आहेत. त्यामुळेच रोज सायंकाळी शहरातील बालभवने लहान मुलांच्या गर्दीने फुललेली दिसत आहेत.

मैदानी खेळ अन् विविध उपक्रमांत सहभागी होण्याचे लहान मुलांचे हक्काचे ठिकाण म्हणजे बालभवन… अडीच वर्षांनंतर सुटीत मुले बालभवनात जाऊन विविध शिबिरांसह मैदानी खेळांचा मनमुराद आनंद लुटत असून, बालभवनात विविध कलांच्या प्रशिक्षण कार्यशाळांपासून ते माहितीपर उपक्रमांपर्यंत तसेच मैदानी खेळही घेतले जात आहेत.

दोन वर्षांपासून ते 13 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी बालभवनमार्फत विविध शिबिरे घेतली जात असून, त्यात निवासी शिबिरांचाही समावेश आहे. महेश बालभवनच्या संचालिका सुरेखा करवा म्हणाल्या की, सध्या अनेक मुले बालभवनात आनंदाने येत असून, त्यांच्यासाठी आम्ही विविध उपक्रम आयोजित करीत आहोत. पालकही मुलांना बालभवनमध्ये पाठवत असून, मैदानी खेळांचाही मुले मनसोक्त आनंद लुटत आहेत.

सुमारे 325 मुले बालभवनात येत असून, त्यांच्यासाठी विविध शिबिरे आम्ही आयोजित करीत आहोत. आतापर्यंत 18 शिबिरे झाली असून, अडीच ते 13 वयोगटातील मुलांसाठी शिबिर घेत आहोत. विविध खेळ, गाणी, हस्तकला, खेळ, गाणी, चित्रकला, नृत्य, ओरिगामी, विज्ञान खेळणी तयार करणे आणि गोष्टी, असे वेगवेगळे उपक्रम मुलांसाठी घेण्यात येत आहेत.

                       सुवर्णा सखदेव, उपसंचालिका, गरवारे बालभवन

बालभवनात खेळायला आल्यानंतर खूप छान वाटते. आम्ही सर्व मुले खूप मजामस्ती करतो. मी विविध खेळांमध्ये सहभागी होतो. आम्ही मित्र एकत्रित येऊन खूप खेळतो. आम्हाला प्रशिक्षकही खूप सहकार्य करतात.

                         अमोघ, बालभवनात येणारा मुलगा

Back to top button