हवाई दलातील आणखी एक अधिकारी हनीट्रॅपमध्ये | पुढारी

हवाई दलातील आणखी एक अधिकारी हनीट्रॅपमध्ये

पुणे; पुढारी वृत्तसेवा : डीआरडीओचा संचालक शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप मोरेश्वर कुरुलकर याच्या कारनाम्यानंतर आणखी एका हवाई दलातील अधिकार्‍याचा हनीट्रॅप प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानी ललनांनी कुरुलकर याचेप्रमाणेच हवाई दलाच्या निखिल शेंडे यांना आपल्या मोहजाळ्यात अडकवून काही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आज कुरुलकर याला न्यायालयात हजर केल्यावर हा नवा प्रकार समोर ठेवला. त्यावर विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी कुरुलकर याच्या एटीएस कोठडीत मंगळवारपर्यंत (16 मे) वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले ’डीआरडी- ओ’चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्या एटीएस कोठडीची मुदत सोमवारी (15 मे) संपली. त्यानंतर कुरुलकर याला शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.

कुरुलकर यास पाकिस्तानातून इ-मेल पाठविण्यात आले आहेत. त्याने देशाच्या सुरक्षेला बाधा आणणारी काही छायाचित्रे पाठविल्याचा संशय आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप आणि मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून, याबाबतचा अहवाल मिळाला आहे.

त्याचबरोबर न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेला 6 टी मोबाईल मिळाला असून कुरुलकर याच्या उपस्थितीत तो मोबाईल चालू करून त्यातील महत्त्वाच्या माहितीचे स्क्रीन शॉट घेण्यात आल्याची माहिती तपास अधिकार्‍यांनी न्यायालयात दिली. गुन्हा करण्यासाठी कुरुलकरने मुंबईतील गेस्टहाऊसचा वापर केला आहे. तसेच त्याच्या उपस्थितीत आणखी माहिती घ्यायची असल्याने त्याला एक दिवस कोठडी मिळावी, अशी विनंती अतिरिक्त सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी केली.

हवाई दलातील अधिकार्‍यालाही ओढले जाळ्यात-

कुरुलकराप्रमाणे हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी निखिल शेंडे यांना पाकिस्तानी ललनांनी -गुप्तचर यंत्रणेने मोहजालात (हनीट्रॅप) ओढल्याचा प्रकार समोर आला आहे. ते सध्या बंगळुरूच्या हवाई दलात कार्यरत आहेत. त्यांची हवाई दलाच्या नियमाप्रमाणे कोर्ट ऑ इन्कॉयरी सुरू आहे. तसेच त्यांची एटीएस चौकशी करण्यात आली असून त्यांचा शिवाजीनगर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर जबाबही नोंदविण्यात आला आहे, असे एटीएसच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी विशेष न्यायालयात सांगितले.

युक्तिवादानंतर एक दिवसाची कोठडी-

सरकारी पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर कुरुलकरचे वकील ऋषीकेश गानू यांनी बाजू मांडताना गुन्ह्यात वापरण्यात आलेले मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पहिल्या दिवसापासून याच मुद्यावर एटीएस पोलिस कोठडी मागत आहेत. आम्ही तपासात सहकार्य केले आहे. त्यामुळे करुलकरला न्यायालयीन कोठडीत पाठविण्याची मागणी केली. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी कुरुलकर याच्या कोठडीत मंगळवारपर्यंत (16 मे) वाढ करण्याचे आदेश दिले.

पाकिस्तानातील एकाच आयपी अ‍ॅड्रेसवरून दोघांना मेसेज-

कुरुलकर आणि शेंडे यांना पाठविण्यात आलेले संदेश पाकिस्तानी एकाच आयपी अ‍ॅड्रेसवरून पाठविण्यात आल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न झाल्याचे एटीएसच्या अधिकार्‍यांनी न्यायालयात सांगितले. विशेष न्यायालयासमोर जेव्हा शेंडे यांचा 164 नुसार नोंद केलेला जबाब सादर करण्यात आला तेव्हा गुन्ह्याची व्याप्ती पाहता न्यायालयाने तपास अधिकार्‍यांना नीट तपास करण्याचा सल्ला दिला.

कुरुलकर वापरायचा चार मोबाईल-

कुरुलकर याच्या तपासात त्याच्याकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यापैकी एका मोबाईलमध्ये महत्त्वाची माहिती असल्यामुळेच त्याने त्याचा पासवर्ड तपास अधिकार्‍यांना दिला नव्हता. त्या मोबाईलचे लॉक उघडून त्यातील डाटा गोळा करण्यासाठी तो मोबाईल फॉरेन्सीक लॅबकडे पाठवला तरीही तो उघडत नव्हता, अखेर करुलकरने त्या मोबाईलचे लॉक उघडून त्यातील काही डाटा एटीएसच्या हवाली केला.

Back to top button