वाढते तापमान, प्रदषणामुळे लहानग्यांमध्ये डोळ्यांचे आजार | पुढारी

वाढते तापमान, प्रदषणामुळे लहानग्यांमध्ये डोळ्यांचे आजार

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये विविध आजारांसाठी दररोज तपासण्यासाठी येणार्‍या लहान मुलांमध्ये 5 टक्के प्रमाण हे डोळ्यांशी संबंधित आजाराचे आढळत आहे. वाढते तापमान, प्रदूषण तसेच, परागकणांचे वातावरणातील वाढलेले प्रमाण आदींमुळे हे आजार बळावत असल्याची माहिती नेत्रविकार तज्ज्ञांनी दिली. सध्याच्या वातावरणाचा त्रास लहान मुलांना होत आहे. मुलांचे डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज सुटणे, डोळे कोरडे पडणे (ड्राय आय) यासारखा त्रास होत आहे.

मुलांमध्ये डोळ्यांचे आजार वाढत असले तरी औषधोपचार घेतल्यावर दोन ते तीन दिवसांमध्ये हा आजार बरा होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या शहरातील कमाल तापमान 41 ते 42 अंश सेल्सियसपर्यंत पोहचले आहे. वाढत्या तापमानाबरोबरच शरीरातील डिहायड्रेशन जास्त होत आहे. त्यामुळे शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मुलांकडून योग्य प्रमाणात पाणी पिले जात नाही. पर्यायाने, त्यांना त्याचा त्रास होत आहे.

अ‍ॅलर्जीचा त्रासही वाढला

वातावरणातील वाढते प्रदुषण, परागकणांचे वाढलेले प्रमाण यामुळे मुलांना अ‍ॅलर्जीचा त्रास होऊ लागला आहे. पर्यायाने डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज येणे असे त्रास संभवत आहे.

काय टाळाल ?

ज्या मुलांना डोळे लाल होण्याचा त्रास आहे त्यांनी वाळूत खेळणे टाळावे.
डोळ्यांना वारंवार हात लावू नये.
डोळे विनाकारण चोळू नये.
डॉक्टरांचा सल्ला न घेता मेडिकलमधून परस्पर औषध घेणे टाळावे.
प्रमाणापेक्षा जास्त टीव्ही, मोबाईल पाहणे टाळावे.

काय करायला हवे ?

सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने डोळे धुवावे.
दिवसभरात भरपूर पाणी प्यावे.
बाहेरून खेळून आल्यानंतर डोळे स्वच्छ धुवावे.

डोळ्यांचे विकार आढळणार्‍या मुलांचे प्रमाण सध्या 5 टक्के इतके आढळत आहे. मुलांना डोळे लाल होणे, डोळे कोरडे पडणे, खाज येणे अशा समस्या जाणवत आहेत. वातावरणात वाढलेले परागकण, प्रदूषण यामुळे त्यांना अ‍ॅलर्जीचा त्रास होत आहे. डोळ्यांवरील औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला हवी. टीव्ही आणि मोबाईलचा एका मर्यादेतच वापर व्हायला हवा.

       – डॉ. रुपाली महेशगौरी, नेत्ररोग शास्त्र विभागप्रमुख, वायसीएम रुग्णालय

Back to top button