

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा: पुणे-नाशिक महामार्गावरील हॉटेल जीवनच्या पाठीमागे असलेल्या ओम नमो श्री गजानन अपार्टमेंटमधील आशिष गजानन माळवदकर यांचा तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट फोडून चोरट्यांनी २० लाख ५ हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम ३ लाख असा एकूण २३ लाख ५ हजार रुपयांचा माल चोरून पोबारा केला. ही माहिती नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
नारायणगाव पोलिस ठाणे हद्दीत पुणे-नाशिक महामार्गांवर जीवन हॉटेलमागे ओम नमो श्री गजानन अपार्टमेंट आहे. यामध्ये आशिष माळवदकर यांचा तिसऱ्या मजल्यावर ३ नंबरचा प्लॅट आहे. रविवारी (दि. १४) सकाळी १०.३० वाजता ते पत्नीसोबत घर व बेडरूमला कुलूप लावून नारायणगाव येथील त्यांच्या कापड दुकानात गेले होते. त्यांनी घराच्या कपाटात सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम ठेवली होती. दरम्यानच्या काळात अज्ञाताने त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. बेडरूमचे लॉक तोडत लाकडी कपाटाचा ड्रॉवर उघडून त्यात ठेवलेले २० लाख ५ हजार रुपयांचे ३९.५ तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख ३ लाख रुपये असा एकूण २३ लाख ५ हजारांचा ऐवज पळविला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व फिंगरप्रिंट विभाग यांना कळवले. पोलिस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गुन्ह्याचा तपास केला जात आहे.