इनामगाव येथील बंधारा पडला कोरडाठाक | पुढारी

इनामगाव येथील बंधारा पडला कोरडाठाक

मांडवगण फराटा (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  इनामगाव (ता. शिरूर) येथील घोड नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे काही बंधारे कोरडेठाक पडले आहेत. काही बंधार्‍यांमध्ये आठ दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. बंधार्‍यांतील पाणीसाठा लवकर संपल्याने पिके धोक्यात आली आहेत. वाढत्या उन्हाच्या झळांमुळे व संबंधित विभागाच्या हलगर्जीपणामुळे बंधार्‍यांतील पाणीसाठा लवकरच संपून गेला आहे. शिरूरच्या पूर्व भागातील इनामगाव, तांदळी, पिंपळसुटी, शिरसगाव काटा तसेच श्रीगोंदा तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी घोडनदीपात्रातून लाखो रुपये खर्च करून शेतात पाणी नेले आहे; परंतु दरवर्षी या बंधार्‍यातून पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर होते. तसेच अनेक ठिकाणी बंधार्‍याची दुरवस्था झाल्यामुळे पाण्याची गळती सातत्याने होत असल्यामुळे पाणीसाठा लवकर संपल्याचेही शेतकर्‍यांनी सांगितले.

घोडनदीच्या पाण्यावर शेतकर्‍यांनी तरकारी पिके केली आहेत; परंतु पाणी संपत असल्यामुळे अनेक शेतकर्‍यांची तरकारी पिके जळू लागली आहेत. हातातोंडाशी आलेला घास जळून जाणार आहे. श्रीगोंदा व शिरूर तालुक्यांसाठी वरदान ठरणार्‍या घोडनदीमुळे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यातही घोडनदी ओसंडून वाहत होती. परंतु, सध्या घोडनदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडले आहे. तसेच विंधनविहिरी व विहिरींची पाणीपातळी खालावली आहे.

चिंचणीचे आवर्तन बंद केल्याने समस्या
मध्यंतरी चिंचणी धरणातून पाणी सोडले होते; परंतु ते पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाही तोच बंद केले, त्यामुळे घोडनदीमधील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्णपणे भरले नाहीत. परिणामी, नदीपात्रामधील पाणी पुन्हा लवकरच संपले. संबंधित विभागाने पाण्याची गळती न होण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज होती, असे शेतकर्‍यांनी सांगितले.

 

Back to top button