उन्हाळ्यातही दिवे परिसरात पाणी ; मात्र बराच भाग अजून वंचित | पुढारी

उन्हाळ्यातही दिवे परिसरात पाणी ; मात्र बराच भाग अजून वंचित

दिवे : पुढारी वृत्तसेवा :  सध्या सर्वत्र उन्हामुळे शरीराची लाही लाही झाली आहे. पाण्याचे स्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत. पुरंदर तालुक्यात काही ठिकाणी भयंकर परिस्थिती आहे. काही भागांत मात्र जानाई-शिरसाई व पुरंदर उपसा जलसिंचन योजनेमुळे ऐन उन्हाळ्यात पाणी खळखळू लागले आहे. पुरंदरचा शेतकरी कष्टाळू आहे, त्यामुळे या पाण्याच्या जोरावर चवदार अंजीर, सीताफळाचे हे आगर बहरू लागले आहे.

परंतु, ढिसाळ नियोजनामुळे या योजनेला घरघर लागली आहे. शिंदवणे घाटातील टप्पा क्र. 4 येथे चार पंपांपैकी केवळ एकच पंप सुरू आहे. पाणी पूर्ण दाबाने उचलता येत नाही. पायथ्याला पाण्याची प्रचंड मागणी आहे. परंतु, पैसे भरूनही ते मिळत नाही. दिवे परिसरात एक महिन्यापूर्वी पाणी आले होते. त्यानंतर शनिवारी पाणी दिवे परिसरात सुटले. हे पाणी पुढे पाटीलवस्तीपर्यंत जाणार आहे, त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हा ओढा खळखळून वाहत आहे.

पाणी मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक
दिवे गावापुढे पंपहाऊस 6 च्या पुढे पाण्याची प्रचंड मागणी आहे. परंतु, संबंधित विभागाचे या शेतकर्‍यांना ठेंगा दाखविण्याचे काम सुरू आहे. परिणामी, या परिसरातील शेतकरी सध्या आक्रमक झाले आहेत. मधल्या काळात आलेल्या पाण्याने शेतकर्‍यांनी सीताफळ बागांना पाणी सोडले. सध्या बागांना छोटी छोटी फळे लागली आहेत. परंतु, पाण्याअभावी ही फळे सुकू लागली आहेत. साहेब काही तरी करा; पण आम्हाला पाणी द्या, अशी आर्त हाक शेतकर्‍यांनी दै. ‘पुढारी’जवळ व्यक्त केली.

 

Back to top button