राजकीय हेतूने दंगली घडविण्याचा राज्यात प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप | पुढारी

राजकीय हेतूने दंगली घडविण्याचा राज्यात प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

पिंपरी : महाराष्ट्रामध्ये जाणूनबुजून दंगली घडविण्याचा प्रयत्न सुरु असून काही प्रमाणात राजकीय हेतूने हे प्रकार सुरु आहेत, असा आरोप करत दंगली घडविण्याचा प्रयत्न करणार्‍यांना अद्दल घडविणार, अशा शब्दांत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला.

पिंपरीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात दोन ठिकाणी दंगलीचा प्रयत्न झाला, तिथे आता पूर्णपणे शांतता आहे. पोलिस अ‍ॅलर्ट असल्याने अनुचित प्रकार घडला नाही. अशा प्रकार होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने पोलिस कुमक त्या ठिकाणी पोहोचली आणि परिस्थिती नियंत्रणात आली. कोणीतरी जाणीवपूर्वक कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे. काही संस्था, व्यक्ती आग लावण्याचा आणि आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना यामध्ये यश मिळणार नाही आणि त्यांना आम्ही सोडणार नाही. हे सर्व बाहेर आणणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.

ते नेते आम्हाला महत्वाचे..

राज्यातील भाजपचे नेते महत्वाचे नसून मोदी महत्वाचे आहेत, या राज ठाकरेंच्या वक्तव्याबाबत बोलताना राज ठाकरे यांच्यासाठी नसतील पण, आमच्यासाठी ते नेते महत्वाचे आहेत, असे फडणवीस म्हणाले.

अध्यक्षांवर दबाव आणणे चुकीचे

सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्याबाबत फडणवीस म्हणाले, विधानसभा अध्यक्षांना घेराव घालू, आम्ही त्यांना फिरु देणार नाही, ही विरोधकांची भाषा कोणत्या लोकशाहीत बसते? अशा दबावातून अध्यक्ष कधीच निर्णय घेत नसतात. बाजू कमकुवत असल्यानेच तुम्ही अशा प्रकारची भाषा करीत आहात. विधानसभेचे अध्यक्ष वकील आहेत, त्यांना कायदा चांगला समजतो. ते कोणतेही बेकायदेशीर काम करणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे रिझनेबल टाईम म्हटले आहे, याचा अर्थ अध्यक्षांना समजतो. त्यामुळे कोणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी ते बळी न पडता योग्य निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे.

Back to top button