पिंपरी : दीड महिन्यात मिळकतकर बिलातून 100 कोटी जमा | पुढारी

पिंपरी : दीड महिन्यात मिळकतकर बिलातून 100 कोटी जमा

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अवघ्या दीड महिन्यात मिळकतकर बिलातून एकूण 100 कोटींचा भरणा नागरिकानीं केला आहे. भरणा करणार्‍या 87 हजार 456 पैकी 70 हजार 489 नागरिकांनी ऑनलाइन बिल भरले आहे. ऑनलाइन माध्यमातून सर्वाधिक 80 कोटींचा भरणा झाला आहे.

शहरात औद्योगिक, निवासी, बिगरनिवासी, मिश्र आणि मोकळ्या जमीनी अशा एकूण 5 लाख 98 हजार मिळकतींची नोंद पालिकेच्या कर संकलन विभागाकडे आहे. सन 2023-24 या वर्षातील बिलांचे वाटप महिला बचत गटाद्वारे करण्यात येत आहे.
सुमारे तीन लाख नागरिकांना बिलाचे वाटप करण्यात आले आहे.

वाकड विभागीय कार्यालयात सर्वाधिक 14 हजार 768 जणांनी बिले भरली आहेत. त्यापाठोपाठ थेरगाव 9 हजार 228, चिंचवड 8 हजार 470, सांगवी 8 हजार 387 आणि सर्वात कमी पिंपरी कॅम्पमध्ये केवळ 714, तळवडेमध्ये 718 नागरिकांनी मिळकत कर भरला आहे.
दरम्यान, 31 मार्च 2023 अखेर ज्यांची 1 लाखांपेक्षा जास्त थकबाकी होती, अशा 22 हजार मिळकतधारकांना जप्ती पूर्व नोटीसा बिलासोबत देण्यात येत आहेत. बिलांचे वाटप होताच जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे, असे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

तीन जूनपूर्वी बिल भरून सवलतीचा लाभ घ्या :

तीन जूनपूर्वी मिळकत कराची बिले भरल्यास मिळकतधारकांना सामान्यकरात मोठी सूट देण्यात येते. नागरिकांनी मिळकतकराची बिले भरून या सलवतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

Back to top button