पुणे रेल्वे स्थानकावरील जुना फूटओव्हर ब्रिज लवकरच खुला ; किरकोळ डागडुजीनंतर येणार वापरात

पुणे रेल्वे स्थानकावरील जुना फूटओव्हर ब्रिज लवकरच खुला ; किरकोळ डागडुजीनंतर येणार वापरात

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रवाशांकरिता धोकादायक म्हणून बंद ठेवण्यात आलेला पुणे रेल्वे स्थानकावरील फूटओव्हर ब्रिज आता लवकरच सुरू करण्यात येणार आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या पुलाचे नुकतेच स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. या ऑडिटदरम्यान प्रशासनाला काही त्रुटी आढळल्या. त्यांची दुरुस्ती केल्यावर हा पूल पुन्हा प्रवाशांना वापरता येणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर इतर प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठीचे रस्ते सध्या अपुरे पडत आहेत. तसेच, ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना इतर प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यांची सरकत्या जिन्यावरून जाताना पडझड होत आहे. साध्या जिन्यावरून जातानाही त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. याबाबत दै. 'पुढारी'मध्ये अनेकदा वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. त्याची दखल घेत, रेल्वे प्रशासनाने नुकतेच या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. त्या वेळी हा फूट ओव्हर बि—ज प्रवाशांच्या वापरात आणता येऊ शकतो, फक्त त्याकरिता किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे, असे पाहणीनंतर रेल्वे अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे रेल्वेने हा जुना पूल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पूल सुरू केल्यामुळे हा फायदा होणार…

पुणे रेल्वे स्थानकावरील हा पूल (एफओबी) बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठी कसरत करत, कुलीला अतिरिक्त पैसे मोजून इतर प्लॅटफॉर्मवर जावे लागते ते बंद होणार आहे. तसेच, हा पूल बंद असल्यामुळे येथे असलेल्या बॅटरीवरील गाड्या धूळ खात पडलेल्या आहेत. त्यांचा वापर प्रवाशांना इतर प्लॅटफॉर्मवर पोहचविण्यासाठी होणार आहे. त्यासोबतच व्हीलचेअरच्या माध्यमातून ज्येष्ठ प्रवाशांची वाहतूक सुरळीतपणे करता येणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरील धोकादायक म्हणून बंद असलेल्या एफओबीचे आम्ही नुकतेच स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. किरकोळ डागडुजी केल्यावर हा पूल पुन्हा वापरात येऊ शकतो, असा निष्कर्ष समोर आला आहे. त्यामुळे आम्ही लवकरच त्या पुलाची दुरुस्ती करून प्रवाशांकरिता खुला करणार आहे.
         – डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे, पुणे विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news