दानापूर एक्स्प्रेसची गर्दी हटता हटेना ! चिमुकल्यासह आई अडकली गर्दीत | पुढारी

दानापूर एक्स्प्रेसची गर्दी हटता हटेना ! चिमुकल्यासह आई अडकली गर्दीत

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  बारमाही गर्दीच्या कचाट्यात सापडलेल्या पुणे-दानापूर एक्स्प्रेसची (गाडी क्र. 12149) गर्दी काही केल्या हटेना, असे चित्र आहे. याकडे रेल्वे प्रशासनही सर्रासपणे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. पुणे रेल्वेस्थानकावर दानापूरसाठी जाणार्‍या प्रवाशांच्या तुफान गर्दीचा व्हिडीओ शनिवारी (दि. 13) एका प्रवाशाने व्हायरल केला. त्यात पुणे रेल्वेस्थानकावर पुणे-दानापूर गाडीसाठी रात्रीच्या वेळी झालेल्या गर्दीत एक महिला आपल्या चिमुकल्यासह अडकल्याचे पाहायला मिळत आहे.

ती महिला आपल्या बाळाला जवळ धरून गर्दीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर बाळ घाबरल्यामुळे जिवाच्या आकांताने ओरडत आहे. या गाडीला होणार्‍या अशा गर्दीमुळे पुणे रेल्वेस्थानकावर चेंगराचेंगरीची घटना घडण्याची शक्यता असून, प्रवाशांच्या जिवाला मोठा धोका आहे. मात्र, तरीसुध्दा उदासीन असलेले रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.

प्रवासी प्रशांत कुमार म्हणतो…
पुणे-दानापूर एक्स्प्रेस या गाडीला झालेल्या गर्दीचा आणि त्यात अडकलेल्या आईसह बाळाच्या ओरडण्याचा मी साक्षीदार आहे. लोकांनी आपल्या गावी कसे जायचे? या गाडीत एवढे लोक कसे चढणार? या गाडीतून असा त्रासदायक प्रवास, हे रोजचेच दुखणे आहे.

रेल्वे सुरक्षा बल म्हणते…
सध्या उन्हाळ्याचा आणि लग्नसराईचा सीझन आहे. त्यामुळे पुणे-दानापूर एक्स्प्रेसला गर्दी होत आहे. रेल्वेने उन्हाळी विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. तसेच रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने या गाडीतील जनरल कोचच्या प्रवाशांना एका रांगेत उभे करून गाडीमध्ये बसविले जात आहे.

पुणे-दानापूर या रोजच्या गाडीला दररोजच गर्दी असते. सीझन वगैरेची कारणे रेल्वेने देऊ नयेत. आत्ता उन्हाळ्याच्या सीझनलासुध्दा फक्त एकच विशेष गाडी सुरू केली आहे. ती अपुरी आहे. रोजच्या गाड्यांव्यतिरिक्त रेल्वेने किमान चार विशेष रेल्वेगाड्या चालवायला हव्यात, तरच प्रवाशांची सोय होईल.
                        – आनंद सप्तर्षी, सदस्य, पुणे रेल्वे स्थानक सल्लागार समिती

उन्हाळ्याच्या सीझनमुळे उत्तर भारतात जाणार्‍या गाड्यांना सध्या गर्दी होत आहे. आम्ही पुणे-दानापूरसाठी एक विशेष गाडी सुरू केली आहे. तसेच आणखी गाड्या वाढवाव्यात, याकरिता रेल्वे बोर्डाला प्रस्ताव देखील पाठविला आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास अतिरिक्त गाड्या चालवू.
                                     – अजय कुमार, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

Back to top button