दहावी, बारावी निकालाचा टक्का घटला ! | पुढारी

दहावी, बारावी निकालाचा टक्का घटला !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावी (आयसीएसई) आणि बारावी (आयएससी) परीक्षांचा निकाल रविवारी जाहीर झाला. दहावीचा निकाल 98.94 टक्के, तर बारावीचा निकाल 96.93 टक्के लागला. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पश्चिम विभागाचा दहावीचा निकाल 99.81 टक्के, बारावीचा निकाल 98.34 टक्के लागला. दहावी आणि बारावीच्या निकालात पहिला क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील विद्यार्थ्यांचा समावेश असून, गेल्या वर्षीच्या
तुलनेत यंदा निकालात घट झाल्याचे दिसून येत आहे.

सीआयएससीईने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी दहावीचा निकाल 99.97 टक्के, तर बारावीचा 99.38 टक्के लागला होता. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल 1.03 टक्क्यांनी, तर बारावीचा निकाल 2.45 टक्क्यांनी घटला आहे. विभागनिहाय निकालामध्ये दहावीच्या निकालात पश्चिम विभागाने 99.81 टक्क्यांसह देशात अग्रस्थान मिळवले. तर बारावीच्या निकालात 99.20 टक्क्यांसह दक्षिण विभागाने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

एकूण 2 लाख 37 हजार 631 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी 2 लाख 35 हजार 114 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात 1 लाख 26 हजार 474 मुले, 1 लाख 8 हजार 640 मुली आहेत. तर 98 हजार 505 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यातील 95 हजार 483 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात 49 हजार 687 मुले आणि 45 हजार 796 मुली आहेत.

मुलींची बाजी
दोन्ही परीक्षांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. दहावीच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अर्ध्या टक्क्याने, तर बारावीच्या निकालात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 2.14 टक्क्यांनी जास्त आहे.

राज्यातील गुणवंत….
दहावीच्या परीक्षेत 99.8 टक्के गुणांसह पहिला क्रमांक मिळवणार्‍या देशातील नऊ विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. त्यात मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये श्रेया उपाध्याय, कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलमधील तनय शाह, चॅम्पियन स्कूलमधील अद्वय
सरदेसाई, मालाडच्या चिर्ल्ड्न्स अकॅडमीतील हिया संघवी, ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलमधील यश भसीन यांचा समावेश आहे. तर बारावीच्या परीक्षेत 99.75 टक्के गुणांसह देशात पहिला क्रमांक मिळवणार्‍या पाच विद्यार्थ्यांमध्ये ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलमधील इप्सिता भट्टाचार्यचा समावेश आहे.

Back to top button